
गेल्या वर्षी 16 नोव्हेंबरला सत्तेवर आलेल्या बिहारच्या नितीशकुमार मंत्रिमंडळाच्या विस्ताराची लगबग आता सुरू झाली आहे. रविवारी भाजपचे बिहार प्रदेश अध्यक्ष संजय जायस्वाल आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तारकेश्वर प्रसाद यांनी या विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सविस्तर चर्चा केल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनाही मंत्रिमंडळात स्थान देऊन मोठी जबाबदारी देण्याचे संकेत सत्ताधारी एनडीएकडून मिळाले आहेत. बिहारमध्ये गेल्या वर्षी संयुक्त जनता दल (जेडीयू ) आणि भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आले. नितीशकुमार यांनी सातव्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 2 उपमुख्यमंत्री आणि 14 मंत्र्यांनी शपथ घेतली होती.
आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना राज्यात वेग आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटून निघालेले बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायस्वाल त्यांनी पत्रकारांजवळ स्वतःच गाडी थांबवत त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. ते म्हणाले, सोमवार सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करा. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाईल.
शाहनवाज हुसेन यांच्याकडे राज्यात मोठी जबाबदारी
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन हे उद्या सोमवारी बिहार विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे बिहार मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळणार हे निश्चित असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शाहनवाज यांना बिहार मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे भाजप श्रेष्ठाrनी स्पष्ट केले आहे.

























































