पकडले जाऊ या भीतीने कैद्याने गिळला मोबाईल, बिहार मधील घटना

कारागृहातील कैद्यांच्या जवळ फोन, शस्त्र तसेच इतर काही वस्तू सापडल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. कारागृह पोलिसांच्या संगनमताने किंवा पोलिसांच्या नजरेपासून लपून कारागृहातील कैदी मोबाईल फोन चालवत असतात. असाच एक प्रकार बिहारच्या गोपालगंज मंडल तुरुंगातून समोर आला आहे.

अमली पदार्थ तस्करी प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या कैसर अली या कैद्याकडे तुरुंगात मोबाईल फोन होता. शनिवारी रात्री तो मोबाईल फोन वापरत असताना अचानक त्याचवेळी ड्युटीवर असलेला हवालदार आला. यावेळी आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने घाईघाईने थेट मोबाईलच गिळला. यामुळे काही वेळातच त्याची प्रकृती खालावली. काहीवेळातच त्याच्या पोटात तीव्र वेदना सुरु झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्याचा एक्स-रे केला असता त्याच्या पोटात मोबाईल स्पष्ट दिसत होता. सध्या कैसर अलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.