
सामना ऑनलाईन । बिकानेर
एक जमाना असा होता की काँग्रेसचे नामदार परदेशी पाहुण्यांना सांप-मुंगुसाचा खेळ दाखवून त्यांना खूश करायचे. आज या नामदारांची चौथी पिढी हेच दाखवून तेच काम करीत आहे. ही चौथी पिढी आजही साप-गारुडय़ाचा खेळ दाखवून व्होट (मत) मागत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यावर केली. राजस्थानात बिकानेर येथे भाजपची निवडणूक प्रचार रॅली झाली त्यावेळी ते बोलत होते.
हिंदुस्थान आता माऊस (कॉम्प्युटरचा माऊस) फिरवून सापाच्या पुढे गेला आहे हेही नामदारांची पिढी विसरली आहे. आता हिंदुस्थान गारुडी नाही, आता हिंदुस्थानच्या माऊसचा गारुडी आहे. तो कॉम्प्युटरचा माऊस चालवीत आहे अशी टीकाही मोदी यांनी गांधी घराण्यावर केली.
प्रियंकांनी हातात घेतला साप, जनता अवाक!
सोनिया गांधी या रायबरेलीमधून लोकसभा लढवीत आहेत. रायबरेलीत शुक्रवारी त्यांनी कुछारिया गावातील गारुडय़ांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रियंका गांधी यांनी हातात साप घेऊन त्याच्याशी खेळल्याही. यावेळी गर्दीतून एकाने प्रेमाने आवाज दिला ‘‘ताई, काळजी घ्या!’’ यावर प्रियंका म्हणाल्या, ‘‘काहीही होणार नाही. इटीज फाइन, हे छान आहे.’’ या घटनेचा एकप्रकारे संदर्भ देऊन मोदी यांनी प्रियंकांवर निशाणा साधला.

























































