हिंदुस्थानची ‘कॉपी’ करायला गेले अन् तोंडावर आपटले, बिलावल भुट्टोंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला अमेरिकन खासदाराने फटकारले

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी तळांवर कारवाई केली. त्यानंतर पाकड्यांची पोलखोल करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळही पाठवले. याचीच कॉपी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांचे शिष्टमंडळ पाठवले. बिलावर भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ अमेरिकेला गेले होते. तिथे त्यांची चांगलीच फजिती झाली आणि त्यांना दहशतवादावर कठोर बोल ऐकावे लागले.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते. यावेळी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य, ज्येष्ठ खासदार ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून पोस्टही शेअर केली आहे.

पाकिस्तानने दहशतवादी संघटनांचा खात्मा केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती सर्व पावले उचलायला हवीत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटने जैश-ए-मोहम्मदवरही निर्णायक कारवाई करायला हवी. याच दहशतवादी संघटेने पत्रकार डॅनियल पर्ल यांची हत्या केली होती, असे ब्रॅड शेरमन म्हणाले. 2002 मध्ये वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार डॅनिलय पर्ल यांचे अपहण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणा दहशतवादी उमर सईद शेखला दोषी ठरवण्यात आले होते.

ब्रॅड शेरमन यांनी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या स्थितीवरही चिंता व्यक्त केली. ख्रिश्चन, हिंदू आणि अहमदिया मुस्लिम यांना हिंसाचार, छळ, भेदभाव किंवा असमानतेच्या भीतीशिवाय त्यांच्या श्रद्धेचे पालन करण्याची आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली पाहिजे, असे ते म्हणाले.