बिमल रॉय यांच्या स्मृति दिनानिमित्त होणार नव्या-जुन्या चित्रपटकर्मींचा सन्मान

450

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीमध्ये आपले नाव सुवर्णाक्षरात कोरणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते दिवंगत बिमल रॉय यांच्या 53व्या स्मृतिदिनानिमित्त बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटीतर्फे बिमल रॉय स्मृती संध्येचे आयोजन  करण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे.

बिमल रॉय स्मृतीसंध्येचे हे बाविसावे वर्ष आहे. ‘जब जब फूल खिले’, ‘कोरा कागज, ‘कुर्बानी’, ‘डॉन’, ‘त्रिदेव’ अशा सदाबहार संगीताची लयलूट असणाऱ्या अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री आनंदजी वीरजी शहा यांना ‘बिमल रॉय स्मृती- जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येईल. त्यांच्याबरोबर, बॉलीवूड आणि समांतर सिनेमात उत्कृष्ट कामगिरी करून ओडिया चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात मानाचे स्थान मिळवून देणारे छायाचित्रणकार पद्मश्री ए के बीर आणि हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचे विद्वत्तापूर्ण दस्तावेजी करणारे ज्येष्ठ पत्रकार – लेखक संजीत नार्वेकर अशा जुन्या –जाणत्या नावांबरोबर ‘बधाई हो’चा दिग्दर्शक अमित शर्मा, ‘बॉम्बेरोज’ या ऍनिमेशन चित्रपटाच्या दिग्दर्शिका गीतांजली राव अशा नव्या दमाच्या चित्रपटकर्मींचाही बिमल रॉय स्मृती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल. विशेष म्हणजे बिमलदांच्या ‘बिराज बहू’ ची भूमिका साकार करणाऱ्या, आज नव्वदी पार केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहून सर्व पुरस्कार विजेत्यांचा सत्कार करणार आहेत.

या पुरस्कार समारंभात सुनीता भुयान या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्हायोलिन वादक आणि त्यांचा वाद्यवृंद खास हजेरी लावणार आहेत. त्यामुळे बिमलदांच्या चित्रपटातल्या अनेक सरस गीतांचा खजिना लगडला जाईल आणि पुरस्कार विजेत्या मान्यवरांनाही सांगीतिक मानवंदना देण्याचे औचित्य साधले जाईल.

बिमल रॉय यांच्याविषयी-
कोलकत्त्यातल्या न्यू थिएटर्स या संस्थेत प्रथमेशचंद्र बारुआ यांच्यासारख्या दूरदर्शी निर्माता-दिग्दर्शकाच्या हाताखाली आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या बिमलदांनी पुढे मुंबईत बिमल रॉय प्रॉडक्शनची स्थापना करत ‘दो बिघा जमीन’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘बिराजबहू’सारख्या सामाजिक जाणीवा व्यक्त करणाऱ्या वास्तववादी चित्रपटांची निर्मिती -दिग्दर्शन करून हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर सिनेमाचा पाया घातला. बिमलदांचा सामाजिक विचार, दुःखित-शोषितांचे जीवन चित्रण करण्यामागची कळकळ, विविध स्तरातल्या स्त्रियांबद्दल वाटणारी अनुकंपा या बरोबर वास्तवदर्शी अभिनय करणाऱ्या अभिनेते -अभिनेत्रींची अचूक पात्रयोजना, उत्कृष्ट छायाचित्रण, अनुरूप गीत -संगीत अशी अनेक वैशिष्ठ्ये असणारे, कलात्मकतेचे मानदंड प्रस्थापित करणारे चित्रपट त्यांच्या प्रयोगशीलतेतून निर्माण होत गेले.

बिमलदांच्या स्मृती केवळ त्यांच्या चित्रपटातूनच नव्हे तर प्रत्यक्ष सामाजिक कार्यातून जागृत राहाव्यात यासाठी या स्मृतिसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. संगीताची लयलूट असणारा हा कार्यक्रम सिनेरसिकांसाठी विनामूल्य खुला आहे. म्हणून या कार्यक्रमाला चित्रपट आणि संगीत रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन बिमल रॉय मेमोरियल अँड फिल्म सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.

रिमेम्बरिंग बिमलदा
स्थळ : हॉल ऑफ हार्मनी, नेहरू सेंटर, वरळी, मुंबई
दिनांक : 21 फेब्रुवारी 2020
वेळ : संध्याकाळी 06 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या