राज्याच्या किनारपट्टीवर घोंघावणारे बिपरजॉय चक्रीवादळ कराचीच्या दिशेने, मात्र मान्सूनचे आगमन विलंबाने होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या किनारपट्टीवर घोंघावणारे विपरजाय चक्रीवादळ सध्या तरी कराचीच्या दिशेने वळले आहे. त्यामुळे राज्याच्या आपत्कालीन विभागाने सुटकेचा निश्वास सोडला आहे पण तरीही सरकारने सज्जता कायम ठेवली आहे. कारण मागील दोन-तीन चक्रीवादळांमुळे महाराष्ट्राला मोठा फटका बसला होता. राज्याच्या आपत्कालीन विभागाचे अधिकारी हवामान खात्याच्या सतत संपर्कात आहेत.

हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला होता. अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. परिणामी ८ ते १० जूनच्या काळात पश्चिम किनारपट्टी तसेच मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्याच्या आपत्कालीन विभागाने सर्व विभागांना अँलर्ट केला होता. पण हवामान खात्याच्या आजच्या अंदाजानुसार विपरजाय चक्रीवादळ कराचीच्या दिशेने वळले आहे.

मात्र तरीही आपत्कालीन विभागाने सज्जता कायम ठेवली आहे. खोल समुद्रात मासेमारी करणा-या मच्छिमारी नौकांना माघारी बोलावले आहे. माशांचा प्रजननाचा काळ लक्षात घेऊन मासेमारीवर बंदी आहे पण मोठया यांत्रिक नौका खोल समुद्रात मासेमारी करतात. त्यामुळे सर्व नौकाना माघारी बोलावण्यात आले आहे. प्रवासी वाहतूकही बंद केली आहे. चक्रीवादळात मोठया प्रमाणावर झाडे कोसळतात. त्यामुळे चेन साँ कटर, झाडे हटवण्यासाठी जेसीवी तयार ठेवले आहेत. मागील खेपेस कोकण किनारपट्टीवर चक्रावादळ धडकले होते तेव्हा वीजेचे खांब कोसळून पडल्याने अनेक गावे अंधारात होती. त्यामुळे आता जनरेटर तयार ठेवले आहेत.

राज्यात मान्सूला विलंब

केरळमध्ये मान्सूचे आगमन झाले असले तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सूला विलंब होण्याची शक्यता आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिका-यांनी व्यक्त केली. राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची मदत व पुनर्वसन विभागात बदली झाली आहे. त्यांनी या विभागाचा नव्यानेच कार्यभार स्वीकारल्यानंतर चक्रीवादळाचा इशारा दिल्यामुळे सचिवही धास्तावले होते. पण चक्रीवादळाने आखाताच्या दिशेने मोर्चा वळवल्याने या विभागातील अधिका-यांनी सुस्कारा सोडला आहे.