वादळ पाकिस्तानच्या दिशेने; मान्सून कोणत्याही क्षणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका नसल्याचे सांगितले जात आहे. चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनच्या गतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी वादळाची दिशा पाहता कोणत्याही क्षणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यात वादळी वाऱयासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीपासून दूर आहे. तसेच ते उत्तरेकडे सरकत असल्याने हिंदुस्थानात या वादळाचा थेट धोका पोहचण्याची शक्यता कमी आहे, मात्र वेगवान वाऱयांचा प्रभाव किनारपट्टीला जाणवू शकतो. दरम्यान, पुढील पाच दिवसांत महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांत पावसाची अंदाज आहे. या काळात समुद्रही खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस

राज्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून मंगळवार आणि बुधवारी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. कोकणातील डहाणूमध्ये 2 मिमी, तर विदर्भातील अमरावतीमध्ये 7 मिमी पावसाची नोंद झाली. 8 ते 10 जूनदरम्यान कोकणात किनारपट्टीवर पावसासह सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात याचदरम्यान तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

– आग्नेय अरबी समुद्र आणि केरळच्या दरम्यान पश्चिमेकडून येणाऱया वाऱयांच्या प्रवाहाने साडेचार किलोमीटरची अपेक्षित उंची गाठली आहे. वादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर केरळमध्ये पावसाला सुरुवात होऊन कधीही मान्सून दाखल होऊ शकतो. तर महाराष्ट्रात 16 जूनच्या दरम्यान मान्सून दाखल होऊ शकतो.

‘बिपरजॉय’चा प्रवास…

आग्नेय अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात केली आहे. प्रतितास 100 ते 110 किमी वेगाने वादळ मध्य अरबी समुद्रात गोव्याच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 900 किमी वर सरकत आहे, जे आणखी तीव्र होण्याची अपेक्षा आहे. 8 जून सकाळपर्यंत 115 ते 125 किमी प्रतितास आणि संध्याकाळपर्यंत त्याचा वेग 125 ते 135 किमी प्रतितास असू शकतो, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.