
रायगड जिल्ह्यात एक हजार मुलांमागे फक्त ९७७ मुली असल्याचे आढळून आले आहे. मुलींचा जन्मदर वाढत असला तरी मुलांच्या तुलनेने तो कमी असल्याने चिंता व्यक्त होत आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जानेवारी ते सप्टेंबरदरम्यान ९७७ मुलींचा जन्म झाला. मुलगा व मुलगी समान असल्याचा संदेश देण्यात येत असला तरी प्रत्यक्षात अजूनही मुलांपेक्षा मुलीच्या जन्माचे प्रमाण बरोबरीने असल्याचे दिसून येत नाही त्यामुळे रायगडकरांना मुलगी नकोशी झाली आहे काय असा सवाल विचार जात आहे.
वंशाचा दिवा म्हणून काहीजण मुलाचाच आग्रह धरत असल्याने जिल्ह्यात आजही जन्माला येणाऱ्या मुले आणि मुलींची संख्या समसमान होऊ शकली नाही मुलगी परक्याचे धन मानून मुलासाठी हट्ट धरणारी दाम्पत्ये आजही समाजात आहेत. सोनोग्राफीद्वारे गर्भातच असणाऱ्या बाळाचे लिंगनिदान करून मुलगाच असल्याची खात्रीही करून घेतली जात असल्याचे दिसून येते. बेकायदा गर्भनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विविध उपाययोजना तसेच कठोर कायदे करण्यात येत आहेत. गर्भनिदान करू नये यासाठी जनजागृतीदेखील केली जाते.
पथनाट्य, भित्तिपत्रकांच्या माध्यमातून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच सुकन्या योजना, सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना राबवल्या जातात.
सरकारी पातळीवर प्रयत्न करूनही रायगड जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर समान झालेला नाही. मुलगी व मुलगा यांची संख्या समान असणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
अशी आहे आकडेवारी
जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षात दर हजार मुलांमागे ९४३ मुलींचा जन्म झाला होता, तर २०२४ या वर्षभरात दर हजर मुलांमागे ९११ मुलींचा जन्म झाला. जानेवारी ते सप्टेंबर २०२५ मध्ये दर हजार मुलांमागे ९७७ मुलींचा जन्म झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.





























































