अजितदादांच्या अंत्यविधीदिनी सब जेलरचे कार्यालयातच बर्थ-डे सेलिब्रेशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला, मात्र दादांवर अंत्यसंस्कार झाले त्याच दिवशी बार्शीतील उपकारागृह प्रमुखांच्या वाढदिवसाचे कार्यालयातच जंगी सेलिब्रेशन करण्यात आल्याचे समोर आले आहे. बार्शी तहसील कार्यालय येथे हा प्रकार घडला.या प्रकरणी नोटीस पाठवून खुलासा मागविण्यात येणार असल्याचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी स्पष्ट केले आहे.

उपकारागृह प्रमुख संदीप नालपे यांचा 29 जानेवारीला वाढदिवस होता. मात्र राज्यात दुखवटा असतानाही बार्शी तहसील कार्यालयातील उपकारागृह विभागात नालपे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी नालपे यांना हार घालून केक कापला व सेलिब्रेशन केले. त्याचे फोटो समोर आले आहेत. त्याची तहसीलदार एफ.आर. शेख यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागण्यात येईल आणि त्यात तथ्य आढळल्यास शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचा दोष ठेवून कारवाई करण्यात येईल, असे शेख यांनी सांगितले.