
कारले कडू असतात, पण औषधीयुक्त असतात असं बोललं जातं. त्यामुळे बाजारात कारल्याला मोठी मागणी असते. हे कडू कारले एका शेतकरी कुटुंबासाठी गोड ठरले आहेत. बाप-लेकाने कारल्याची शेती केली असून त्यांनी यातून लाखोंचा नफा कमावला आहे.
चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या वेजगाव येथील गे बाप-लेक राहताता. बाबुराव आस्वले, दीपक आस्वलेयांनी अवघ्या दीड एकारात कारल्याची लागवड केली होती. शेती नफ्याची नाही, अशी अधूनमधून ओरड ऐकायला येते. काही शेतकऱ्यांनी मात्र शेतीत नवीन प्रयोग करून शेतीला फायदेशीर केलं आहे. चंद्रपूर जिल्हातील मागासलेला तालुका अशी ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुका आहे. केवळ शेती येथील मुख्य व्यवसाय असून तालुक्याला वर्धा, वैनगंगा,अंधारी नाद्यानी वेढा दिला खरा मात्र एकही मोठा सिंचन प्रकल्प येथे नाही. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील शेतीला बसत असतो. पिकली तर शेती नाहीतर माती अशी येथील अवस्था. या साऱ्या संकटावर मात करीत काही शेतकऱ्यांनी शेतीत उंच भरारी घेतली आहे.
तालुक्यातील वेजगाव येथील शेतकरी पिता, पुत्राची चर्चा सध्या होते आहे. बाबुराव आस्वले हे 65 वर्षाचे.पण त्यांची शेतीची ओढ सुटलेली नाही. मोठा मुलगा दीपक यांच्या सोबतीने ते शेतात नवीन प्रयोग करीत असतात. दोन एकर जागेत ते मिर्ची, भाजीपाल्याचे पिक घेतात. यावर्षी त्यांनी दीड एकर जागेत कारले पिकाचे उत्पादन घेतले. गावातील परशुराम लेडांगे यांनी कारले पिकाचा प्रयोग केला होता. त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले. दीपक आस्वले यांनी मार्गदर्शन घेतले आणि कारल्याची लागवड केली. कारले पिकासाठी पन्नास हजार रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितलं. पिक चांगलं जमून आलं. आता पर्यंत त्यांनी एक लाखाचे कारले चंद्रपूरचा बाजारात विकले आहेत. पुन्हा एक ते दीड लाखाचे उत्पादन होणार, अशी त्यांना आशा आहे. कृषी क्षेत्रातील कुठलीही पदवी नसताना केवळ अनुभवाच्या जोरावर पिता, पुत्रानी शेती फुलवीत आहे. दिवसभर शेतात घाम करणाऱ्या आस्वले कुटुंबांनी शेतीतूनच आर्थिक प्रगती साधली.