
कोरोना संकट काळात राजकारण होऊ नये याचा अर्थ जनतेची दुःख मांडायची नाहीत असा होत नाही असे म्हणत महाराष्ट्रात भाजपने शुक्रवारी ‘माझे अंगण, माझे रणांगण’ आंदोलन पुकारले आहे. राज्यातील जनतेने हातात काळे बोर्ड, काळ्या रिबिनी, काळे मास्क, काळे शर्ट, काळी पॅन्ट, काळी ओढणी असे कपडे घालून आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारचा निषेध करावा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे, मुंबई आणि राज्यातील शहरी भागात व रुग्णांची वाढती संख्या तसेच लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी, मजुरांना राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी भाजपकडून राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. अंगावर काळे कपडे परिधान करत, हातात काळे बोर्ड देऊन भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शनी जयंतीच्या दिवशी होत असलेल्या या आंदोलनाकडे भाजपचे नेते राज पुरोहित यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की ‘आम्ही आनंदाने काळे कपडे परिधान करून या आंदोलनात सहभागी होणार आहोत शेवटी आम्ही जनतेसाठी लढतोय’
विरोधी पक्ष गप्प बसू शकत नाही
शेतकऱ्यांचा कापूस आणि इतर तयार माल खरेदीविना पडून आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना अपूर्ण राहिल्याने त्यांची चिंता वाढली आहे. नोकरदारांना आपले काम कधी सुरू होईल याची काळजी आहे, उद्योग थंडावले आहेत, व्यापार टप्पा आहे आणि सर्वांनाच भवितव्याची फिकीर आहे. अशा स्थितीत कोरोनाचे राज्यातील संकट वाढतच चालले आहे. मुंबईला बसलेला कोरोनाचा विळखा कसा सुटणार या काळजीने मुंबईकर धास्तावले आहेत. अशा गंभीर संकटात विरोधी पक्ष म्हणून भाजप गप्प बसू शकत नाही, त्यामुळेच आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
चंद्रकांत दादांचे अंगण कुठे
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मूळचे कोल्हापूरचे आणि आमदार झालेत कोथरूड विधानसभेतून चंद्रकांत दादा यांचे अंगण आणि रणांगण हे वेगवेगळे असल्याने ते नेमके कुठे आंदोलन करणार असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांना पडला आहे सोशल मीडियाचा सुद्धा दिवसभर चंद्रकांत दादांचा अंगण कुठे अशी चर्चा सुरू होती


























































