इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आणखी पुरावे समोर येतील, राहुल गांधी यांचा दावा

फक्त 25 जागांच्या जोरावर नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत असा घणाघात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आणखी पुरावे समोर येतील असा दावाही राहुल गांधी यांनी केला आहे.

आज बंगळुरूत एका सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका केली आहे. शुक्रवारी बंगळुरूमध्ये झालेल्या एका सभेत राहुल गांधी महणाले की, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत आमच्या आघाडीला यश मिळाले होते, पण चार महिन्यांनंतर भाजपने विधानसभा निवडणूक जिंकली. आम्ही याचा शोध घेतला तेव्हा कळाले की निवडणुकीत गडबड झाली आहे. त्यांनी कर्नाटक आणि बिहारचा देखील उल्लेख केला. राहुल यांनी निवडणूक आयोगावर लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला.

राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्र आणि कर्नाटकबाबत आम्ही माहिती घेतली तेव्हा कळले की 1 कोटी नवीन लोकांनी मतदान केले आहे. जे लोक लोकसभा निवडणुकीत मतदानाला आले नव्हते, त्याच 1 कोटी लोकांनी महाराष्ट्रात अचानक मतदान केले. या वाढलेल्या मतांच्या जोरावरच भाजपने निवडणूक जिंकली. आम्हाला आधीच संशय होता की काहीतरी चुकीचे आहे. कर्नाटकमध्येही आम्ही लोकसभा निवडणुकीत 16 जागांवर आघाडीवर होतो, पण शेवटी फक्त 9 जागा जिंकल्या. निवडणुकीत घोळ झाल्यामुळे हे घडलं, आम्ही तपास केला, पण निवडणूक आयोग कोणताही प्रतिसाद देत नाही असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींनी भाजपावर आरोप करताना म्हटले की, भाजप आणि निवडणूक आयोग लोकशाहीची हत्या करत आहेत. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाला आपलं संविधान मतदानाचा अधिकार देतं. आपल्याला त्याचं संरक्षण करायचे आहे. आम्ही संविधानाचे संरक्षण केले होते, पण मागच्या निवडणुकीत भाजपाने संविधानावर हल्ला केला होता असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी फक्त 25 जागांच्या जोरावर पंतप्रधान बनले आहेत, आणि जर आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा मिळाला तर आम्ही सिद्ध करू की मोदी मतांची चोरी करून पंतप्रधान बनले आहेत. भाजपने जिंकलेल्या २५ जागा फक्त 35 हजार मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत. हा प्रश्न मी एकटाच विचारत नाही, तर संपूर्ण हिंदुस्थानातील सर्व विरोधी पक्ष हेच विचारत आहेत. निवडणूक आयोगाने वेबसाइट्स बंद केल्या आहेत. राजस्थान, बिहारच्या वेबसाइट्स बंद केल्या आहेत असेही राहुल गांधी म्हणाले.