महायुतीत वादाचा ‘खड्डा’, मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचं खापर मिंधे गटानं भाजपवर फोडलं

देशातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून मुंबई-गोवा महामार्गाची नोंद केली जाईल. गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्याचे काम सुरुच आहे. आजपर्यंत या महामार्गावर शेकडो कोटी रुपये खर्च झाले आहेत. असे असले तरी काम आटोपण्याचे आणि खड्ड्यांचे विघ्न संपण्याचे नाव नाही. आता याच मुद्द्यावरून महायुतीमध्ये वादाचा खड्डा पडला आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेचे खापर मिंधे गटाने भारतीय जनता पक्षावर फोडले आहे.

भाजपचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे फक्त चमकोगिरी आणि शायनिंग मारण्यासाठी येतात. अनेक पुलांचे काम बाकी आहे. रस्ताही खड्ड्यात गेलाय. त्यामुळे नुसता पाहणी दौरा कशासाठी? खरेतर रविंद्र चव्हाण हे कुचकामी मंत्री असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे, अशी मागणी मिंधे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली.