
महाराष्ट्र राज्य शिखर बँक सहकारी बँकेतील चौकशीप्रकरणी भाजप अथवा राज्य सरकारचा कोणताही संबंध नाही. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने गुन्हा दाखल केला असून न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये लक्ष घातले, असा खुलासा राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.
आमदारकीचा राजीनामा व त्यामागील भूमिका स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी राज्य शिखर बँकेतील चौकशीप्रकरणी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर रोष व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्य शिखर बॅंकेत भ्रष्टाचार झाला असे राज्य सरकार म्हणत नाही किंवा भाजपही तसे म्हणत नाही. पवार कुटुंबीयांत गृहकलह नसेल तर चांगली गोष्ट आहे. तसेच पवार कुटुंबीयांत एकी राहावी यासाठी मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो, असेही चंद्रकात पाटील म्हणाले.


























































