LokSabha 2019 प्रवरेची ताकद दक्षिण भागात सक्रिय 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

निवडणूक म्हटलं की यंत्रणा ही अत्यंत महत्त्वाची बाब. कोणत्याही प्रकारची उणीवा राहयला नको याची खबरदारी आता घेतली जात आहे. महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांनी योग्य पध्दतीने यंत्रणा वापरुन महायुतीचा मेळ घालून दिला. प्रवरेची ताकदसुध्दा या निमित्ताने पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आघाडीमध्ये एकवाक्यता नसल्याने व काँग्रेस फुटीमुळे राष्ट्रवादी आता ताकसुध्दा फुकूंन प्यायला लागली आहे.

नगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही आता प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला जागा न सोडल्याने डॉ.सुजय विखे यांना भाजपामध्ये यावे लागले. तर राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी अनेक दिग्गजांची नावे आली खरी पण त्या नावाला कलाटणी देत, विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्यायच राहिला नव्हता.

कोपरगांव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यावेळेला स्व.बाळासाहेब विखे यांनी त्या मतदारसंघाचे नेतृत्व केले. दक्षिण  -उत्तर वाद हा जिल्ह्याला नवखा नाही. उत्तर भाग बागायती तर दक्षिण भाग दुष्काळी म्हणून त्याची ओळख कायम राहिली. 1991 साली बाळासाहेब विखे यांच्या विरुध्द यशवंतराव गडाख यांची खरी लढत झाली. ही लढाई न्यायलयात गेली. आदर्श आचारसंहिता या निवडणुकीत खर्‍या अर्थाने पहायला मिळाली. त्याची आजही आठवण जरी राजकारण्यांना होत असेल तरी मात्र, आता तो काळ किंवा त्या वेळचे राजकारण हे बदलत गेल्यामुळे 1991 ची पुनरावृत्ती तर सोडाच, पण आहे तो पक्ष टिकवण्याचे आवाहन आघाडीसमोर आजही उभे ठाकले आहे.

नगर दक्षिणमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार असले तरी तेथे त्यांची संख्या 2009 च्या तुलनेत कमी झाली आहे. उत्तरेत पिचड असले तर अन्य जागा राष्ट्रवादीला मिळू शकली नाही, जसे दक्षिणेत काँग्रेसचा आमदार नाही तसेच उत्तरेत तीन आमदार असल्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये याच मुद्यावरुन तुमची ताकद की आमची ताकद हा खेळ याही उमेदवारीपर्यंत सुरुच राहिला. दक्षिणेत आमचे प्राबल्य आहे, आमची जागा आहे असा हट्ट राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी लावला की कार्यकर्त्यांनी लावला हे सुध्दा पक्षीय पातळीवर न उलगडणारे कोडे आहे. काँग्रेसचा दक्षिणेत आमदार नसल्याने विखेंच्या रुपाने ताकद मिळाली असती. मात्र, दक्षिण आमच्याकडेच असा दावा राष्ट्रवादीने सांगून विखेंचा पुर्वीपासून असलेला हाडवैर या निमित्ताने खुलेआम पहायला मिळाला.

विखेंनीसुध्दा ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. आता यंत्रणा देखील कामाला लावली. नव्या जुन्याचा मेळ घालण्यास सुरवातही केली. फार फोडाफोडीच राजकारण न करता गेल्या अडीच वर्षापासून सुजय विखेंनी नगर दक्षिणला बरोबर घेत विखे पॅटर्न व काँग्रेस अशी सांगड घातली. तेव्हा पासूनच राष्ट्रवादीला विखेंची उमेदवारीवर कुरघोडी करण्याची संधी मिळाली. पण आता विखेंनी पक्ष सोडल्याने ते आता भाजपाचे उमेदवार झाले आहेत. सध्या यंत्रणा राबविण्याची व शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याची पध्दती पाहताना तो सध्या नगर दक्षिणच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

केलेली कामे गेल्या दोन वर्षात घेतलेली आरोग्य शिबीरे, अथवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेला निधी तसेच सामाजिक सेवेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दिलेला मदतीचा हात हे सर्व पाहता आजही तिच विखे यंत्रणा महायुतीच्या बरोबरीने काम करत असल्याने कोणताही दगा फटका होणार नाही याची दक्षता घेत नियोजन आखले जात आहे.