शिंदे गटाविरोधात भाजपची ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’…! प्रतीक्षानगरमधील घोषणाबाजीने महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर

राज्यात अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदे गटामधील अंतर्गत वादामुळे युती फिस्कटली असताना मुंबईमध्ये युती होऊनही दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड वाद धुमसत असल्याचे समोर आले आहे. यातूनच आज प्रभाग क्र. 173 प्रतीक्षानगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून शिंदे गटाविरोधात ‘पन्नास खोके, एकदम ओक्के..!’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.

मुंबईत शिंदे आणि भाजप युती झाली आहे. युतीचा जाहीरनामादेखील उद्या जाहीर केला जाणार आहे. असे असताना वॉर्ड 173 मध्ये ‘मैत्रीपूर्ण’च्या नावाखाली होणाऱ्या निवडणुकीत वाद असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. या ठिकाणी भाजपच्या शिल्फा केळुसकर आणि शिंदे गटाच्या पूजा कांबळे यांच्यामध्ये ‘मैत्रीपूर्ण’ लढत होत आहे. शुक्रवारी सकाळी दोन्ही गटांची प्रचारफेरी सुरू असताना कार्यकर्ते आमने सामने आले असताना भाजपकडून अचानक ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशी जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. मुंबईत युती असतानादेखील भाजपने शिंदे गटाला डिवचल्याने त्यांनीदेखील भाजपविरोधात घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाल्यामुळे भाजपचे हे डिवचणे शिंदे गटाच्या नेत्यांना चांगलेच झोंबले आहे.

असे आहे प्रकरण

वॉर्ड क्र. 173 जागावाटपात शिंदे गटाच्या वाटय़ाला आला. त्यानुसार शिंदे गटाने पूजा कांबळे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली. मात्र त्याआधीच भाजपच्या इच्छुक उमेदवार शिल्पा केळुसकर यांनादेखील अर्ज दिला होता आणि हा अर्ज वैध ठरल्याने दोन्ही पक्षांनी या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. मात्र दोन्ही पक्षांतील वाद काही संपलेले नाहीत. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनीदेखील केळुसकर यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी एबी फॉर्म चोरून भरल्याचा आरोप करण्यात आला.