
निवडणुका जिंकण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या भाजपने इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून 2019-20 सालात तब्बल 271 कोटींच्या देणग्या गोळा केल्याची बाब समोर आली आहे. इलेक्टोरल ट्रस्टने निवडणुकीदरम्यान विविध पक्षांना पुरवलेल्या निधीपैकी 80 टक्के निधी हा एकटय़ा भाजपला पुरवला आहे. यातील सर्वाधिक देणग्या या एअरटेल आणि डीएलएफने दिल्या असून यामध्ये ‘प्रूडेंट’कडून 271.75 कोटी, जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून 45.95 कोटी, एबी जनरल ट्रस्टकडून 9 कोटी आणि समाज इलेक्टोरल ट्रस्टकडून देण्यात आलेल्या 3.75 कोटी रुपयांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी सर्वाधिक निधी गोळा करणारा भाजप नंबर वन पक्ष ठरला आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली असून भाजपच्या तुलनेत काँग्रेस खूपच मागे आहे. काँग्रेसच्या खात्यात देणग्यांच्या माध्यमातून केवळ 58 कोटी आले आहेत.
पक्षांचे उत्पन्न
निवडणूक आयोगाने 2019-20 चा वार्षिक ऑडिट रिपोर्टही प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पक्षांचे उत्पन्न नमूद करण्यात आले असून यात टीआरएस पक्षाने सर्वाधिक 130.46 कोटींच्या उत्पन्नाची नोंद केली आहे. वायएसआरसीपीने 92.7 कोटी रुपयांची तर बिजदने 90.35 कोटी उत्पन्नाची नोंद केली आहे. अण्णा द्रमुक 89.6 कोटी, द्रमुक 64.90 कोटी आणि आम आदमी पक्षाला 49.65 कोटी रुपये मिळाले आहेत. या उत्पन्नात इलेक्टोरल ट्रस्टसह अन्य मार्गाने आलेल्या उत्पन्नाचीही नोंद करण्यात आली आहे. 2019-20 या वर्षात काँग्रेसचे उत्पन्न 682 कोटी इतके होते जे मागील वर्षाच्या तुलनेत 25 टक्क्यांनी कमी आहे.
इलेक्टोरल बॉण्डमधूनही कमाई
स्थानिक पक्षांनी इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळवले आहे. भाजप 50.5 कोटी, डीएमके 45.5 कोटी, आप 17.6 कोटी, समाजवादी पार्टी 10.84 कोटी, जेडीएस 7.5 कोटी, अण्णा द्रमुक 6.05 कोटी आणि राजदला 2.5 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.




























































