केरळविरोधात द्वेष पसरवण्यासाठी भाजपने काही लोकांना तैनात केले; नितेश राणेंच्या वक्तव्यावर के.सी. वेणुगोपाल यांचा पलटवार

भाजप नेत्याकडून केरळचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख करण्यात आल्याबाबत काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केरळविरोधात द्वेष पसरवण्यासाठी भाजपने काही माणसे तैनात केली आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केला आहे. भाजप नेते नितेश राणे यांनी केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला होता. त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

याबाबत वेणूगोपाल यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात वेणुगोपाल यांनी भाजप नेत्यांवर राज्याचा ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून उल्लेख करणे हे भाजपचे द्वेषाचे राजकारण आहे. केरळच्या जनतेबाबत त्यांच्या भावना यातून दिसून येत आहे, असे वेणुगोपाल म्हणाले. केरळविरोधात विष पसरवण्यासाठी भाजप द्वेष पसरवणाऱ्यांना तैनात करते. ‘मिनी पाकिस्तान’ सारख्या शब्दांचा वापर करणे यातून केरळबाबत त्यांच्या मनात असलेला द्वेष दिसून येतो, असे वेणूगोपल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

केरळ हे जागतिक स्तरावर एक मॉडेल राज्य म्हणून ओळखले जाते. जे शिक्षण, आरोग्य सेवा आणि एकूण जीवनमानात मानव विकास निर्देशांकांमध्ये सातत्याने अव्वल आहे. केरळ हे सांप्रदायिक सौहार्दाचा दीपस्तंभ आहे. जिथे सर्व धर्म आणि पंथाचे लोक शतकानुशतके शांततेने एकत्र राहतात. सर्वसमावेशकता, सामाजिक न्याय आणि समतावादाचा पुरस्कार करणाऱ्या श्री नारायण गुरु, चटम्बी स्वामीकल आणि महात्मा अय्यंकली यांसारख्या व्यक्तींचा उल्लेख करत वेणूगोपाल यांनी केरळच्या सामाजिक सुधारणेकडे लक्ष वेधले.

अशी फुटीरतावादी वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेते नितेश0 राणे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करावी, अशी मागणीही वेणुगोपाल यांनी केली. पंतप्रधानांनी तात्काळ राणेंना पदावरून हटवावे,अशी मागणीही त्यांनी केली.