काल नाराजी, आज पहिल्या रांगेत हजेरी! चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला मेधा कुलकर्णी उपस्थित

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचा नुतणीकरणाचे आज केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णीही हजर होत्या. विशेष म्हणजे काल फेसबुक पोस्टद्वारे नाराजी व्यक्त केलेल्या मेधा कुलकर्णी आज पहिल्या रांगेत दिसल्या.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणादरम्यान मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख केला. अनिल शितोळे, गिरीष बापट यांच्यासह तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीसाठी पूल बांधण्याची मागणी केली होती आणि वेळोवेळी निवेदनं दिल्याचे गडकरी म्हणाले.

तत्पूर्वी चांदणी चौक पुलाच्या उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेत तसेच व्हॉट्सअॅपवरून पाठवलेल्या आमंत्रणात कुठेही मेधा कुलकर्णी यांचा उल्लेख नव्हता. यामुळे नाराज झालेल्या मेधा कुलकर्णी यांनी एक पोस्ट शेअर करत चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

काय म्हटले कुलकर्णींनी?

-सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टला ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे’, असे शीर्षक मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे. त्या म्हणतात, ‘माझ्यावरील कुरघोडय़ा, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दु:ख माbत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी.’

– चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वत: गडकरी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले होते, ‘तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या सांगण्याकरून मी हा मुद्दा घेतला.’

– अनेक असे संदर्भ देता येतील की, ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ याविषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकटय़ाचेच असल्यासारखे कागणारे कोथरूडचे सद्य नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

– मध्यंतरी पंतप्रधान मोदी, अमित शहा पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्षपदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन, तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या-त्या वेळी गोष्टी वरिष्ठांपुढे मांडल्या आहेत.