
>> विजय जोशी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेऊन काय उपयोग झाला? त्यांनी पक्षासाठी काय केले? असा संतप्त सवाल भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते करत आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी होती. त्यांच्या नेतृत्वात १३ पैकी फक्त ३ नगर परिषदांत भाजपला विजय मिळाला, बाकी ठिकाणी पराभवाची नामुष्की पदरात पडली. जिल्हा वार्यावर सोडून ते स्वत:च्या मतदारसंघात लपून बसले. या पराभवाचे धनी अशोक चव्हाण हेच असल्याचा आरोप होत आहे.
काँग्रेसमध्ये असताना भाजपनेच अशोक चव्हाणांवर ‘आदर्श’ घोटाळ्याचे आरोप केले होते. विशेषत: आरोप करण्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडातील प्रचार सभेत ‘आदर्श’ घोटाळ्याचा जाहीर उल्लेख केला होता. ‘आदर्श’ घोटाळ्याचे पाप डोक्यावर घेऊन अशोक चव्हाण भाजपच्या वळचणीला आले आणि पवित्र झाले. एवढेच नाही तर भाजपने अशोक चव्हाण यांना राज्यसभेवरही पाठवले. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. अजित गोपछडे यांनाही राज्यसभेची बक्षिसी मिळाली. दोन खासदार असल्यामुळे नांदेड जिल्हा कमळमय होईल अशी भाजप श्रेष्ठींची धारणा होती, परंतु विधानसभा निवडणुकीत भाजपचे फक्त चार आमदार निवडून आले. लोकसभेच्या पोटनिवडणुकीतही भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले.
स्थानिक स्वराज्यमध्येही भाजपचे तीनतेरा!
जिल्ह्यात बारा नगर परिषदा आणि एका नगर पंचायतीची निवडणूक पार पडली. अशोक चव्हाण हे या निवडणुकीसाठी स्टार प्रचारक होते. भाजपची संपूर्ण धुरा त्यांच्या खांद्यावर होती. अशोक चव्हाण यांच्या नियोजनाखाली मुखेड आणि लोहा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. या दोन्ही ठिकाणी भाजपच्या पदरी पराभव आला. नायगाव मतदारसंघात उमरी आणि धर्माबाद येथेही भाजपचा पराभव झाला. गंमत म्हणजे धर्माबादेत अशोक चव्हाण यांच्या आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या मराठवाडा जनहित पार्टीने भाजपच्या अधिकृत उमेदवाराला धूळ चारली. उमरीत गोरठेकर गटाने भाजपला सावरण्याचीही संधी दिली नाही. बिलोलीत तर मतदारांनी भाजपला हद्दपारच केले. येथेही अशोक चव्हाणांनी मराठवाडा जनहित पार्टी नावाने ‘बी’ टीम उभी करून आपल्याच पक्षाचे उमेदवार पाडले. मुखेड आणि नायगाव येथे राजेश पवार आणि तुषार राठोड हे भाजपचे आमदार आहेत. परंतु अशोक चव्हाणांनी त्यांना कामच करू दिले नाही. किनवट येथे भाजपचे भीमराव केराम आमदार आहेत, परंतु येथेही भाजपचा दारूण पराभव झाला. केवळ भोकर, मुदखेड आणि कुंडलवाडीत भाजपला विजय मिळाला. लोहा येथे अशोक चव्हाणांनी हट्टाने गजानन सूर्यवंशी आणि त्यांच्याच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिली. हे सहाही जण पराभूत झाले आणि भाजपही येथे रसातळाला गेला.
भाजपमध्येच दुफळी
अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेण्यास जिल्ह्यातील निष्ठावंतांचा कडवा विरोध होता. परंतु निष्ठावंतांना डावलून चव्हाणांसाठी पायघड्या घालण्यात आल्या. अशोक चव्हाण आल्यानंतर भाजपला सोनेरी दिवस येतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती, परंतु चव्हाणांच्या दरबारी राजकारणाचा फटका भाजपला बसला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सभा होऊनही भाजपची पडझड थांबली नाही. त्यामुळे अशोक चव्हाणांना पक्षात घेऊन काय उपयोग झाला, असा संतप्त सवाल निष्ठावंत भाजप कार्यकर्ते करत आहेत.





























































