भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांचे नगरसेवकपद धोक्यात! लघुवाद न्यायालयाकडून प्रभाग 106ची निवडणूक रद्द

भाजपचे मुंबई महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे चांगलेच गोत्यात आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱयाने उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी न केल्याने तसेच शिंदे यांनी फौजदारी खटले व गुन्हेगारी माहिती निवडणूक आयोगापासून लपवल्याने लघुवाद न्यायालयाने मुलुंड प्रभाग 106 ची निवडणूक रद्द केली आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे शिंदे यांचे नगरसेवकपद जाणार असून याप्रकरणी हायकोर्टात दाद मागण्यासाठी न्यायालयाने शिंदे यांना चार आठवडय़ांची मुदत दिली आहे.

 पालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीत मुलुंड प्रभाग क्रमांक 106 चे उमेदवार प्रभाकर शिंदे यांनी निवडणूक आयोगापासून गुन्हेगारी माहिती लपवली असा दावा करत तेथील रहिवासी भार्गव कदम यांनी लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी विद्यमान नगरसेवक प्रभाकर शिंदे, निवडणूक आयोग, राज्य सरकार तसेच पालिकेला प्रतिवादी करण्यात आले. या याचिकेवर लघुवाद न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश पी. आर. चौधरी यांच्यासमोर आज सुनावणी घेण्यात आली. याचिकाकर्ते कदम यांच्या वतीने ज्येष्ठ वकील बाळकृष्ण जोशी, अॅड. वीरेंद्र पेठे व अॅड. दर्शना पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, शिंदे यांनी त्यांच्या विरोधातील फौजदारी खटले व  गुह्यांची थोडक्यात माहिती निवडणूक आयोगापासून लपवली. शिंदे यांच्या वतीने हा दावा फेटाळण्यात आला. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐपून घेत निवडणूक प्रक्रियेत त्रुटी आढळल्याने प्रभाग क्रमांक 106 ची निवडणूकच रद्द केली. या निकालाविरुद्ध  हायकोर्टात अपील करता यावे म्हणून निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती देत लघुवाद न्यायालयाने शिंदे यांना चार आठवडय़ांची मुदत दिली.