
राज्यातील मंदिरे उघडावीत यासाठी हिंदुत्ववादी आणि आध्यात्मिक संघटनांनी आज राज्यभरात ठिकठिकाणी घंटानाद आंदोलन केले. विशेष म्हणजे, या आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आणि दोन दिवसांत मंदिरे उघडली नाहीत तर आम्ही मंदिरांचे दरवाजे उघडू, असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला.
मुंबई, कोल्हापूर, नगर, सोलापूर यांसह अनेक शहरांतील प्रमुख मंदिरांबाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. सांगलीत पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मानसिक आधाराचीही सर्वांना गरज आहे. धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय योग्य नाही. राज्यात दारूची दुकाने उघडली, मॉल्स उघडले; परंतु धार्मिक स्थळे उघडण्यासाठी मात्र सरकार तयार नाही हे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले. देशात अनेक ठिकाणी धार्मिक स्थळे उघडली, परंतु त्यामुळे कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला असे झाले नाही, असेही त्यांनी सांगितले.



























































