भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर; निष्ठावंतांना डावलल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून पक्षाचे कार्यालय बंद

राजकीय स्वार्थासाठी इतर पक्षातील नेते-कार्यकर्त्यांना पक्षात घेणे भाजपला आता चांगलेच महागात पडत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातही असाच प्रकार घडला असून निष्ठावंतांना डावलल्याने भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचे कार्यालय बंद केले आहे. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाचा झेंडा आणि बोर्डही उतरवला आहे.

विशेष म्हणजे राज्यात कॅबिनेट मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षातील वरीष्ठ नेत्यांकडून आपली मुस्कटदाबी होत असल्याचे सांगत या ठिकाणी आधीच धुसफूस सुरू होती. मात्र आता पक्षात झालेल्या नव्या निवडींवरून हा नवा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आपल्याच पक्षाकडून न्याय मिळत नसल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या उद्रेकानंतर उद्या निर्णायक जाहीर मेळावा घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.