भूमीपुत्रांकडे कौशल्यच नाही, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रद्रोही बडबड

10125

देशात सध्या मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू असून राज्याराज्यातील उद्योग, व्यवसायांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याने महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने भूमिपुत्रांना यामध्ये संधी देण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमीपुत्रांच्या कौशल्य आणि बुद्धीमत्तेवर प्रश्न उपस्थित केला आहे. भूमीपुत्रांकडे कौशल्यच नाही, ते विकसित करता येणं शक्य वाटत नाही, अशा आशयाचं विधान त्यांनी केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखताना केलेल्या लॉकडाऊन नंतर आता देशातील स्थलांतरित मजुरांचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला आहे. त्याच बरोबर स्थानिक उद्योग, व्यवसाय मजुर नसल्याने अडचणीत आले आहेत. ही अडचण दूर करून भूमीपुत्रांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार नवी संधी निर्माण करून देत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमीपुत्रांच्या कौशल्यावर, बुद्धीमत्तेवर शंका उपस्थित केली आहे. एका व्हिडीओमध्ये मजुरांच्या संदर्भातील प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी हे संतापजनक विधान केले आहे.

ते म्हणाले की, ‘स्थलांतरित मजुर हे महाराष्ट्राच्या अर्थ व्यवस्थेचा हिस्सा होते. त्यामुळे राज्यातील अर्थव्यवस्था सुरळीत करताना त्रास होईल. राज्य सरकार म्हणतं आहे की भूमीपुत्रांना आम्ही संधी देऊ, त्याचं ही मी स्वागत करतो. मात्र लेबर रिप्लेसमेंट कागदावर होत नाही, जसं हा गेला त्याच्या जागी दुसरा आला, असं होत नाही. कारण इथे बराच काळ राहून त्यांनी कौशल्य विकसित केलं होतं, त्यामुळे ते इथे होते. असं कौशल्य महिन्या दोन महिन्यांत भूमीपुत्र विकसित करू शकणार नाहीत. भूमीपुत्रांना संधी मिळाल्यास आनंद होईल, पण मला वाटतं की हे भूमीपुत्रांना अजिबात शक्य नाही. म्हणून स्थलांतरित मजुरांसोबत चांगला व्यवहार झाला नाही असं मी मानतो.’

देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांनी राज्यातील जनतेच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केल्याने राज्यातील सर्वच स्तरातून त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी त्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.

देशातील विविध राज्यांमधून स्थलांतरित मजुर हे आपापल्या गावी परतत आहेत. लॉकडाऊन वाढल्याने पोटाची खळगी भरण्यास साधन नाही म्हणून असंख्य मजुर पायी निघाले आहेत. महाराष्ट्र सरकारने या मजुरांची योग्य काळीज घेत त्यांची व्यवस्था केली आहे. मात्र यूपी, बिहार, कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये मजुरांचे हाल सुरू आहेत. मजुरांनी स्वतः व्हिडीओ काढून महाराष्ट्राची स्तुती केली आहे. मात्र तरी देखील विरोधीपक्ष राज्याच्या जनतेच्या विरोधात अशी विधानं करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या