मला मारून टाकायला कोरोना  उपचारात घातपात केला! भाजप आमदाराचा स्वकियांवरच खळबळजनक आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात भाजपातील पक्षांतर्गत वादही चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. मला मारून टाकण्यासाठी पक्षातीलच विरोधकांनी आपल्यावर कोरोना उपचार सुरू असताना घातपात करण्याचा प्रयत्न केला होता, असा खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे अकोल्यातील आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केला आहे.

अकोट येथील जाहीर प्रचारसभेत आमदार भारसाकळे यांनी भाजपमधील विरोधकांवर हा आरोप केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कोरोनाची लागण झाल्याने आपल्यावर अकोल्यात उपचार सुरू होते. त्यावेळी अचानकपणे आपले जेवण बंद करण्यात आले होते. त्यावरून काहीतरी गडबड आहे असा संशय मला आणि कुटुंबीयांना आला होता. माझ्या पत्नीने तर उपचारासाठी तातडीने नागपूरला जाऊया असा सल्ला दिला होता. कारण पक्षातीलच विरोधक मी मरावे याची वाट पाहत होते, असे भारसाकळे म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी कुणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही.