महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण, भाजप आमदाराला अटक

97

सामना ऑनलाईन । इंदूर

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेला आकाश विजयवर्गीय यांना पोलिसांनी अटक केली आहे. इंदूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आकाश विजयवर्गीय यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. आकाश यांच्यासोबत अन्य 10 लोकांनाही अटक करण्यात आली आहेत.

पोलिसांनी त्यांच्याविरोधात कलम 353, 294, 323, 506, 147, 148 गुन्हा दाखल केला आहे. अटकेनंतर पोलिसांनी आमदार आकाश विजयवर्गीय यांना न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने आकाश विजयवर्गीय यांचा जामीन नाकारला असून त्यांना 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महानगरपालिकेचे अधिकारी अतिक्रमविरोधाक कारवाई करत होते. याच दरम्यान इंदूरचे नवनिर्वाचित आमदार आकाश तिथे पोहोचले. महानगरपालिकेचे कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात आकाश यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली.

घटनेनंतर पोलीस आणि महानगरपालिकेचे अन्य अधिकारी या ठिकाणी हजर झाले. यावेळी भ्रष्टाचार आणि गुंडगिरीविरोधात आमचे काम सुरूच राहणार असे आमदार आकाश म्हणाले. आवेदन, निवेदन आणि दणादण हे आमची त्रिसुत्री असेल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या