क्लबच्या निवडणुकीत भाजप खासदाराने केला गेम, राहुल गांधींशी हात मिळवून शहा-नड्डांच्या उमेदवाराला पाडले!

राजधानी दिल्लीतील काॅन्स्टिटय़ूशन क्लबच्या निवडणुकीत भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी बाजी मारली आहे. रुडी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे उमेदवार संजीव बालियान यांना पराभवाची धूळ चारली. त्यासाठी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मदत घेतली. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात या निकालाची चर्चा रंगली आहे.

काॅन्स्टिटय़ूशन क्लबच्या सदस्यांमध्ये 1295 आजी-माजी खासदारांचा समावेश आहे. आजच्या निवडणुकीत त्यापैकी 680 खासदारांनी मतदान केले. त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही समावेश होता. रुडी यांनी राहुल यांची भेट घेऊन खेळ पालटला. ते तब्बल 100 मतांच्या फरकाने सचिवपदी निवडून आले. त्यांच्या पॅनलचे इतर सर्व सदस्यही विजयी झाले. लोकसभेचे अध्यक्ष हे काॅन्स्टिटय़ूशन क्लबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, मात्र क्लबचा कर्ताधर्ता सचिव असतो. गेल्या दहा वर्षांपासून राजीवप्रताप रुडी या पदावर आहेत.