भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला रक्षा खडसे यांची दांडी! महाजन म्हणतात, पूर्वपरवानगी घेऊन गैरहजर

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्या पूर्वपरवानगी घेऊनच बैठकीला गैरहजर असल्याचे स्पष्ट केले आहे.

खडसे यांच्या राजीनाम्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपची अधिक पडझड होऊ नये यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रांत संघटक विजय पुराणिक यांच्या प्रमुख उपस्थिती जळगाव जिल्हा कोअर कमिटीची तातडीची बैठक मंगळवारी दुपारी घेण्यात आली. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, चंदूलाल पटेल, माजी आमदार स्मिता वाघ आदी या वेळी उपस्थित होते. मात्र खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे बैठकीला उपस्थित नव्हत्या.

पूर्वकल्पना दिली होती

या बैठकीनंतर रक्षा खडसे यांच्या अनुपस्थिबाबत पत्रकरांनी गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले, रक्षा खडसे काल रात्रीच पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्यासंदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पनादेखील दिली होती. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीसंदर्भात तर्पवितर्प लढवणे चुकीचे आहे. दिल्लीहून परत आल्यावर त्या पक्षाच्या सर्व कार्यक्रमात दिसतील.

खडसेंच्या जाण्याने भाजपला कोणताही फटका नाही

भाजपा हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्तीकेंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो. एकनाथ खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या