खासदारकी वाचवण्यासाठी भाजपचे डॉ. शिवाचार्य हायकोर्टात

72

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य चांगलेच अडचणीत सापडले आहेत. डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस आढळल्याने जात पडताळणी समितीने ते रद्द केले आहे. जात प्रमाणपत्राअभावी डॉ. शिवाचार्य यांची खासदारकी धोक्यात आली असून पडताळणी समितीच्या या निर्णयाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

जात पडताळणी समितीने डॉ. शिवाचार्य यांनी जोडलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली. या समितीने ठिकठिकाणी जाऊन कागदपत्रांची माहिती घेतली त्यावेळी डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळून आले. त्यानुसार जात पडताळणी समितीने ते रद्द केले. या निर्णयाविरोधात डॉ. शिवाचार्य यांनी ऍड. संतोष न्हावकर यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे तसेच जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. बोगस जात प्रमाणपत्र सादर करणाऱया डॉ. शिवाचार्य यांच्या याचिकेवर कोणताही निर्णय देण्यापूर्वी न्यायालयाने आपले म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी होटगी येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार मिलिंद मुळे यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या