नवी मुंबईत भाजपने मंदा म्हात्रेंना गंडवले, जिल्हाध्यक्षांच्या सह्या नसलेले एबी फॉर्म 13 उमेदवारांना दिले

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी फिल्मी स्टाईल बनवाबनवी केली. म्हात्रे यांनी मागणी केलेल्या 13 उमेदवारांना एबी फॉर्म दिले, मात्र त्यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी स्वाक्षरी केली नाही. आज सकाळी उमेदवारांनी पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पाटील मोबाईल बंद करून अज्ञात स्थळी गेले. वन मंत्री गणेश नाईक आणि भाजपवाल्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी गंडा घातल्यामुळे म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांच्या संतापाचा भडका उडाला.

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपच्या वतीने वन मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजीव नाईक यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. भाजपच्या बेलापूरमधील आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसाठी 13 ठिकाणी उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हात्रे यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र त्यानुसार या समर्थकांना उमेदवारी अर्ज तयार करण्यास सांगण्यात आले. परंतु एबी फॉर्म देण्यात आले नाहीत. आज पहाटे त्यांना एबी फॉर्म मिळाल्याने आनंद व्यक्त केला. मात्र एबी फॉर्मवर जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांची स्वाक्षरी नव्हती. त्यामुळे हा आनंद फार काळ टिकला नाही. पाटील उद्या सकाळी स्वाक्षरी करणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले, मात्र सकाळीच पाटलांचा फोन बंद झाला. आपल्याला उल्लू बनवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वांनी मंदा म्हात्रे यांचे घर गाठून नाराजी व्यक्त केली.

हिंमत असेल तर 111 नगरसेवक निवडून आणा!

माझ्यावर अन्याय करा, पण कार्यकर्त्यांना डावलू नका, असे मी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. त्यानंतरही नाईक यांच्या इशाऱयावरून माझ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे. ही मर्दुमकी नाही. गणेश नाईक यांच्यात जर खरी हिंमत असेल तर त्यांनी नवी मुंबईत 111 नगरसेवक निवडणून आणून दाखवावेत. माझ्या कार्यकर्त्यांना जसे घरी बसवण्यात आले तसेच नवी मुंबईकर तुमच्या मुलांनाही घरी बसवतील, अशी आगपाखड मंदा म्हात्रे यांनी या वेळी केली.

बेलापूरमध्ये बंडाळी

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी देण्यात आलेल्या एबी फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदा म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता घंगाळे, नेरुळमधील पदाधिकारी सुहासिनी नायडू यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनाम दिला आणि दुसऱया पक्षात प्रवेश केला. सुहासिनी नायडू यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रभाग क्रमांक 22मधून उमेदवारी दिली आहे.

सांगलीत आचारसंहिता भंग; दोन गुन्हे दाखल

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत सांगलीमध्ये आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. विना परवानगी रॅली काढणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहिता कक्षात एकूण सहा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी चार तक्रारींमध्ये तथ्य आढळले नाही.

मुंबईसाठी ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध

आम आदमी पार्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात चोवीस तास मोफत पाणीपुरवठा, 200 युनिटपर्यंत मोफत वीज, जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण आणि आरोग्य सेवा अशी आश्वासने देण्यात आली आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुंबईमध्ये आपने 75 उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

अजित पवारांनी भरला उमेदवारी अर्ज!

पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींना वेग आला असतानाच पुण्यात एक चकित करणारी बातमी समोर आली. पिंपरी-चिंचवड महानगर पालिका निवडणुकीत चक्क अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, हे अजित पवार उपमुख्यमंत्री नाहीत. त्याच्याच नावाशी साधर्म्य असणारे अजित पोपट पवार आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 25 मधून उमेदवारी अर्ज भरला आहे.

अनामत रकमेसाठी आणली पिशवी भरून चिल्लर

पुणे-महानगरपालिकेची निवडणूक आता खऱया अर्थाने रंगात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची घाई झाली. त्यातच पुण्यात एका उमेदवाराने इतरांचे टेन्शन वाढवले होते. या उमेदवाराने चिल्लर स्वरूपात अनामत रक्कम आणून निवडणूक अधिकाऱयांना चांगलीच मेहनत करायला लावली. ही सर्व चिल्लर अधिकाऱयांना मोजावी लागली. गणेश किरण खानापुरे असे या उमेदवाराचे नाव असून त्यांनी पुण्यातील घोरपडी पेठ-गुरुवार पेठ समताभूमी या प्रभाग क्रमांक 26 (ड) येथून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारांना अनामत रक्कम म्हणून अडीच हजार ते पाच हजार रुपये भरावे लागतात. खानापुरे यांनी एका पिशवीतून ही चिल्लर क्षेत्रीय कार्यालयात आणली. चिल्लर स्वरूपात असलेली ही रक्कम मोजण्यासाठी अधिकाऱयांचा बराच वेळ गेला.

लातूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा राजीनामा

लातूर – लातूरमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून भाजपने दुसऱया उमेदवाराला तिकीट दिल्याने लातूर शहर संघटनातील संघटन सरचिटणीस असलेले निखिल गायकवाड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये निष्ठावान राहून काम करण्याचे मला फळ मिळाले, धन्यवाद… अशी भावनिक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली. पक्षात काम करूनही तिकीट मिळत नसेल तर पक्षात कशासाठी राहायचे, असेही ते म्हणाले. निखिल गायकवाड हे भाजपाचे जुने व सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. परंतु भाजपमध्ये आयारामांचे जंगी स्वागत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट नाकारले जात असल्याने संतप्त होऊन निखिल गायकवाड यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे.

चंद्रपुरात भाजपकडून गुन्हेगारांना उमेदवारी

चंद्रपूर- चंद्रपुरात भाजपने गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या दोन व्यक्तींना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही भाजपने जाहीर केलेल्या यादीवर तीव्र आक्षेप घेत उमेदवार बदलण्याची मागणी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रभाग क्रमांक 4मधून अजय सरकार आणि प्रभाग क्रमांक 3मधून पूजा पोतराजे यांना उमेदवारी दिल्याने जोरगेवार यांनी आक्षेप घेतला आहे. अजय सरकार याच्यावर 302 सहित 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर पूजा पोतराजे यांचे पती मनोज पोतराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात समाज माध्यमावर बदनामीकारक मोहीम चालवली होती, असा जोरगेवार यांचा आरोप आहे.

प्रचार साहित्यांनी दुकाने सजली!

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजपसह अन्य पक्षांकडून एबी फॉर्मचे वाटप जाहीर झाले असून उमेदवारांनी अर्जही भरले आहेत. आता अवघ्या दोन ते तीन दिवसांनंतर खऱया अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. प्रचारासाठी लागणाऱया साहित्यांनी मुंबई, ठाण्यासह अन्य शहरांतील दुकाने सजली आहेत. मुंबईतील एका दुकानात प्रचारासाठी लागणारे सर्व साहित्य दिसत आहे. शिवसेनेची मशाल, मनसेसह अन्य पक्षांची उपरणीही दुकानात दिसत आहेत.