भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीला पंकजा मुंडे यांची दांडी

भाजप ओबीसी मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दांडी मारली. त्यामुळे भाजपवर पंकजा मुंडे अजूनही नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी भाजपच्या वतीने ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार संगमलाल गुप्ता, राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री डॉ.संजय कुटे आणि प्रदेश मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोष आहे. स्वतः पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती. ‘‘पक्षात राम नाही असे वाटेल त्या दिवशी बघू’’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे ओबीसी मोर्चाच्या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. मात्र पंकजा मुंडे या ओबीसी मोर्चा कार्यकारिणीचा भाग नसल्याने बैठकीला आलेल्या नव्हत्या, असा खुलासा भाजपच्या वतीने करण्यात आला.

दरम्यान, या बैठकीत भाषण करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. आपल्या सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवले होते, पण महाविकास आघाडी सरकारने ते गमावले आणि आता ते पुन्हा बहाल करण्याबाबतही हे सरकार उदासीन असल्याने आणखी पाच वर्षे ते गमावण्याची वेळ येऊ शकते अशी टीकाही त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या