भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका महिलेसह तिच्या मुलावर भाजपच्या पदाधिकाऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार काल दसऱ्याच्या दिवशी खारघरमध्ये घडला. या गुंड पदाधिकाऱ्याच्या हल्ल्यात या महिलेचे डोके फुटले. त्यामुळे ती रक्तबंबाळ झाली. या महिलेला तिचा मुलगा रुग्णालयात घेऊन जात असताना या पदाधिकाऱ्याने आणि त्याच्या गुंडांनी त्यांना वाटेत अडवले आणि बेदम मारहाण केली. त्यामुळे महिलेला रुग्णालयात घेऊन न जाता मुलाने पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी भाजपच्या तालावर नाचणाऱ्या खारघर पोलिसांनी या पदाधिकाऱ्याच्या आणि त्याच्या गुंडांच्या मुसक्या आवळण्याऐवजी तक्रारदार मुलालाच कारवाईची नोटीस बजावली.
खारघरमध्ये राहणारे किरण गीते आणि त्यांची आई सिंधूबाई गीते हे याच परिसरात भाजीपाला आणि फळे विकण्याचा व्यवसाय करतात. काल दसऱ्याच्या दिवशी भाजपचा खारघर उपशहर अध्यक्ष रमेश खडकर हा त्यांच्याकडे आला आणि त्यांनी या मायलेकरांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत किरण आणि सिंधूबाई जखमी झाल्या.
आपल्या जखमी आईला घेऊन किरण हे रुग्णालयात जात होते. ते मोटारसायकलवरून सेक्टर 12 मधील शिवाजी चौकातील दुर्गा माता मंदिरासमोर आले असता, खडकर आणि त्याच्या गुंडांनी तिथेत्यांना अडवले व दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. सिंधूबाई यांचे डोके जोराने दगडावर आदळवले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्या रक्तबंबाळ झाल्या. किरण यांनी स्वतःची आणि आईची या गुंडांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि जखमी अवस्थेत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला, मात्र खडकर याला वाचवण्यासाठी थातूरमातूर कलमे लावली.
रहिवाशांचे आंदोलन
खारघर पोलीस भाजपचा गुंड पदाधिकारी रमेश खडकर याला वाचवत आहेत, असे निदर्शनास आल्यानंतर सुमारे 200 रहिवाशांनी खारघर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. आरोपींना तातडीने अटक करा, अशी मागणी आंदोलनकांनी केली. परंतु पोलिसांनी खडकर याच्या मुसक्या आवळण्याऐवजी तक्रारदार किरण गीते यांनाच कलम 168 नुसार नोटीस बजावली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली तर आपल्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी धमकी पोलीस उपनिरीक्षक सुजित ठाकूर यांनी या नोटीसच्या माध्यमातून गीते यांना दिली आहे. या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.