
मी राहीन किंवा न राहीन; पण 2014ला जे जिंकून आलेत ते आता 2024ला जिंकणार का, याची चिंता त्यांनी करावी. 2024ला ते पंतप्रधान राहतील काय, अशा स्पष्ट शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट आव्हानच दिले आहे. 2024 साठी सर्व विरोधी पक्षांनी एकीचे बळ दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजपला धोबीपछाड देत नितीश कुमार ‘एनडीए’तून बाहेर पडले आणि बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेससह सात पक्षांच्या महागठबंधनचे सरकार आले आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाची आणि राजद नेते तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपला सत्तेबाहेर फेकल्यामुळे देशभरात समाधान व्यक्त होत असून, बिहारमध्ये आझादी का अमृतमहोत्सव सुरू झाल्याची सर्वत्र भावना आहे.
शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना नितीश कुमार यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ओपन चॅलेंज दिले. 2024च्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडून तुम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, मी कोणत्याही पदासाठी दावेदार नाही. मी राहीन किंवा न राहीन याची चिंता सोडा, पण ज्या व्यक्तीने 2014ची निवडणूक जिंकली ती व्यक्ती 2024 जिंकणार आहे का? ते पंतप्रधान राहणार काय, याची चिंता त्यांनी केली पाहिजे.
ईडी, सीबीआयला घाबरत नाही – ललनसिंह
भाजपला धोबीपछाड दिल्यामुळे जदयू नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा लागू शकतो, अशी शंका व्यक्त होत आहे. यावर जदयूचे अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ ललनसिंह म्हणाले, भाजपला तपास यंत्रणांचा कितीही गैरवापर करू द्या, ईडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही.
भाजपने जदयूलाच हरवण्याचा प्रयत्न केला
भाजपबरोबरची युती का तोडली? या प्रश्नावर नितीशकुमार म्हणाले, भाजपचे वागणे योग्य नव्हते. 2020च्या निवडणुकीत युती असतानाही भाजपने जदयूला हरवण्यासाठी प्रयत्न केले. भाजपबरोबर राहायला नको, अशीच सर्वांची भावना होती. त्यामुळे भाजपची साथ सोडली.
अटलजींनी दिलेले प्रेम विसरू शकत नाही
दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी नितीशकुमार यांनी आदर व्यक्त केला. जॉर्ज फर्नांडिस आम्हाला वाजपेयींकडे घेऊन गेले होते. अटलजी आणि त्यावेळच्या नेत्यांनी आम्हाला दिलेले प्रेम, आपुलकी आम्ही कधीही विसरू शकत नाही, अशा भावना नितीशकुमार यांनी व्यक्त केल्या.
भाजपची 2015सारखी स्थिती होणार
आमचे महागठबंधन सरकार व्यवस्थित कार्यकाळ पूर्ण करेल. बिहारमध्ये 2025ला विधानसभा निवडणूक आहे. भाजपला आत्तापासूनच चिंता लागली आहे की, 2015 सारखी त्यांची स्थिती होईल, असा सणसणीत टोलाही नितीश कुमार यांनी लगावला. 2015ला बिहारमध्ये भाजपची जदयूशी युती नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी तब्बल 42 सभा घेतल्या होत्या, तरीही भाजपला अवघ्या 53 जागा मिळाल्या होत्या.