सत्ताधारी भाजपची गोची, पनवेल महापालिकेला उपमहापौरांची शिव्यांची लाखोली

3171

महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळेच पनवेलमध्ये कोरोना वाढल्याची कबुलीच उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या आपल्याच महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढताना त्यांनी अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली. त्यामुळे आम्ही किती चांगले काम करत आहोत हे सांगणाऱया भाजप नेत्यांची गोची तर झालीच, शिवाय उपमहापौरांच्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या शिवराळ ऑडिओ क्लिपने सत्ताधाऱयांचा सुसंस्कृतपणादेखील पनवेलच्या ‘वेशीवर’ टांगला गेला आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पनवेल महापालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान लॉकडाऊन तसेच पालिकेकडून कोविड नियंत्रणासाठी राबविल्या जाणाऱया उपाययोजनांबाबत त्यांना एका पत्रकाराने दूरध्वनी करून प्रश्न विचारला. त्यावर उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आपला संताप व्यक्त करत पालिकेच्या धोरणांवर टीकेची झोड उठवली. इतकेच नाहीतर त्यांनी थेट शिव्यांची लाखोली वाहत आतापर्यंत पालिकेने किती पीपीई किट, मास्क वाटले, किती चाचण्या झाल्या, असे सवाल उपस्थित केले. कसले नियोजन नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगत खालच्या पातळीवर जाऊन पालिकेला शिव्या घातल्या. गायकवाड यांच्या या क्लिपने तोंड लपविण्याचा वेळ आलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

नसेल जमत तर खुर्च्या खाली करा!
क्लिपबाबत गायकवाड यांना विचारले असता त्यांनी आपण प्रशासनाला बोलल्याचे सांगत सारवासारव केली. मात्र या क्लिपमधील उपमहापौरांची भाषा ऐकून अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून सत्तेत असलेल्या व्यक्तीने असे असंसदीय शब्द वापरणे चुकीचे आहे. प्रशासनावर पकड नसेल तर भाजप नेत्यांनी खुर्च्या खाली कराव्यात, असा संताप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या