
गुजरात विधानसभा निवडणुकीचे मतदान 5 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यासाठी भाजपमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी 5 आणि 6 डिसेंबर रोजी पक्षाचे प्रमुख जे पी नड्डा यांनी त्यांच्या कोअर कमिटीच्या सदस्यांची बैठक बोलावली आहे. 5 डिसेंबर रोजी पक्षाच्या मुख्यालयात दुपारच्या जेवणानंतर ही बैठक सुरू होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या विविध कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे.
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या जी-20 अध्यक्षपदाचा लोगो, थीम आणि वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जी-20 गटाचे हिंदुस्थानला अध्यक्षपद मिळणे ही अभिमानाची बाब असून देशासाठी ही एक मोठी संधी आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. त्यामुळे या दोन दिवसांदरम्यान, भाजपचे नेते 2023 साठी हिंदुस्थानच्या G20 अध्यक्षपदाचे प्रदर्शन करण्यावर तसेच या गोष्टीचा राजकीय फायदा कसा घ्यायचा यावर देखील चर्चा करतील.
या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी हे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नड्डा यांनी भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस यांना या बैठकीसाठी बोलावले आहे, यावेळी पक्षाच्या बूथ आणि पृष्ठ समित्यांच्या स्थापनेचा आढावा घेण्यात येणार आहे. बूथ स्तरावर पंतप्रधानांची मन की बात, लोकसभा प्रवास योजना आणि सोशल मीडिया समन्वय हे या बैठकीमधील प्रमुख मुद्दे असणार आहेत.
G20 चे महत्त्व, त्यात समाजाचा सहभाग याचा अजेंडा बैठकीत ठरवण्यात येणार आहे. हिंदुस्थानच्या G20 अध्यक्षपदाच्या ऐतिहासिक क्षणाचा राजकीय लाभ घेण्याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, हिंदुस्थानच्या G20 अध्यक्षपदाच्या लोगोमध्ये कमळ, भाजपचे पक्ष चिन्ह, वापरल्याने काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्ष ‘निर्लज्जपणे’ स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र जगभरात हिंदुस्थानच्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधानांचा प्रयत्न म्हणून G20 अध्यक्षपदाचा प्रचार करण्यासाठी मोहीम आखली जाणार आहे.



























































