
शिंदे गटामुळे डोंबिवलीच्या विकासाला ग्रहण लागल्याचा अप्रत्यक्ष आरोप खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला होता. या घटनेला दोन दिवस होत नाहीत तोच कल्याणमधील शांतीदूत सोसायटीच्या पुनर्विकास प्रकरणावरून भाजप-शिंदे गटात पुन्हा बिनसले आहे. शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर बिल्डरांची वकिली करत असल्यामुळे शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास रखडल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केला आहे, तर नरेंद्र पवार हे प्रकरण मुद्दाम चिघळवत असल्याचा आरोप भोईर यांनी केला. पुनर्विकासाच्या ‘हंडीतील लोणी’ खाण्यासाठी भाजप-शिंदे गटात सुरू असलेली चुरस पाहता रहिवाशांना हक्काचे छप्पर कधी मिळणार हा खरा प्रश्न आहे.
बिल्डर श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांच्यामुळे शेकडो कुटुंबे देशोधडीला लागण्याच्या उंबरठ्यावर आहेत. याप्रकरणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ३ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. कल्याण प्रांत कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनात सोसायटीचे अनेक सदस्यही सहभागी आहेत. विकासकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याच्या पाठीशी असलेल्या राजकीय व्यक्तींनाही वठणीवर आणले पाहिजे अशी ठाम भूमिका पवार यांनी घेतली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नरेंद्र पवार हे प्रकरण मुद्दाम चिघळवत असल्याचा आरोप केला आहे. याला उत्तर देताना पवार यांनी आमदार भोईर हे विकासकांची वकिली करत आहेत असा गंभीर पलटवार केला आहे.
14 वर्षे प्रकल्प रखडवला
सोसायटीचा पुनर्विकास गेल्या 14 वर्षांपासून रखडलेला असून रहिवाशांना अद्यापही हक्काची घरे मिळालेली नाहीत. टायकून अवंती ग्रुप एलएलपी या विकासक कंपनीचे श्रीकांत शितोळे आणि चेतन सराफ यांनी रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. भाजप-शिंदे गटातील आरोप-प्रत्यारोप पाहता शांतीदूत सोसायटीतील रहिवाशांमध्ये संभ्रम व अस्वस्थता आहे. खरंच आमचे घर मिळणार की हे राजकीय नाट्य असेच सुरू राहणार? असा सवाल सोसायटीतील अनेकजण उपस्थित करत आहेत.