भाजपचा शिंदे गटाला ‘दम मारो दम’, ठाण्यात सोबत येता की जाता? केळकर यांचा सूचक इशारा

ठाणे पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झाली असली तरी भाजप व शिंदे गटात अजून युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. भाजप वाढीव जागांसाठी आग्रही असून आजही चर्चेचा सूर टिपेला पोहोचला, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर आज ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनी शिंदे गटाला ‘येता की जाता?’ असा थेट अल्टिमेटम दिला आहे. चर्चेचे काथ्याकूट अजूनही न संपल्याने भाजप व शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच अस्वस्थ झाले आहेत.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिंदे गटात आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. मात्र त्याच्यातून फार काही निष्पन्न झालेले नाही. मंगळवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली, पण तीदेखील निष्फळ ठरली. जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. त्यातच भाजप ठाण्यात ४५ जागांसाठी आग्रही आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत. तसेच कल्याण-डोंबिवलीत भाजपचाच महापौर करा असा आग्रह रवींद्र चव्हाण सातत्याने करताना दिसत आहेत. त्यामुळे शिंदे गटाचे भाजपने चांगलेच टेन्शन वाढवले असल्याने ठाण्यात युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित होऊ शकला नाही.

भाजपने शिंदे गटाला शनिवारची डेडलाईन दिली असल्याची माहिती भाजपचे ठाणे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच आम्ही आमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिला आहे. युती होवो किंवा न होवो आम्ही कशाही पद्धतीने निवडणूक लढण्यास तयार आहोत, असा सूचक इशारा केळकर यांनी शिंदे गटाला दिला आहे.

प्रत्येक प्रभागात घरोघरी प्रचार सुरू

२०१७ मध्ये भाजप स्वतंत्रपणे लढलो, त्यापूर्वीही आम्ही स्वतंत्र लढलो होतो. याचीही आठवण आमदार केळकर यांनी शिंदे गटाला करून दिली. आम्हाला लढाईची सवय असून त्या प्रत्येक प्रभागात घरोघरी प्रचार सुरू केला असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.