आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपची कारणे दाखवा नोटीस, लोकसभा-विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी भाजपने विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षशिस्त भंग करण्याबाबत नोटीसमध्ये नोंदविण्यात आलेल्याला आक्षेपांबाबत सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी दिले आहेत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता सदर कार्यक्रमास आपली अनुपस्थिती होती. लोकसभा निवडणूक काळात आपल्या परिवाराने भाजपच्या विरोधात काम केल्याचे निदर्शनास आले. पत्रकार परिषदेत आपल्या परिवारातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य केले. आपल्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या बूथ प्रमुखांना धमकावणे, पोलिंग एजंट मिळू न देणे असे प्रकार केल्याचे निदर्शनास आल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

जनतेला भाजपविरोधी मतदानास प्रवृत्त केले

लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन मतदारसंघातील जनतेला भाजपविरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचे निदर्शनास आले. विधानसभा निवडणुकीमध्येही त्यांचेच काम केल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.