1000 जन्म घेतले तरी तुम्ही सावरकर बनू शकणार नाही; भाजपचे राहुल यांना प्रत्युत्तर

1650

काँग्रेसने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ आंदोलनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही. मी माफी मागणार नाही’ असे वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी 1000 जन्म घेतले तरी ते सावरकर बनू शकणार नाही, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे. कलम 370, एअर स्ट्राईक आणि नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात पाकिस्तानची भाषा बोलणारे राहुल गांधी सावरकर कधीही बनू शकत नाही, असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी 1000 जन्म घेतले तरी ते सावरकर बनू शकत नाही. सावरकर ‘वीर’ होते. सच्चे देशभक्त आणि देशासाठी बलिदान देणारे होते. कलम 370, एअर स्ट्राईक आणि नागरिकता सुधारणा कायद्याविरोधात पाकिस्तानची भाषा बोलणारे राहुल गांधी ‘वीर’ असू शकत नाही. ते कधीही सावरकरांची बरोबरी करू शकत नाही, असे पात्रा म्हणाले. वीर सावरकर सच्चे देशभक्त होते. उधार घेतलेल्या आडनावाने कोणीही देशभक्त बनू शकत नाही. वेषांतर करून अनेकांनी देशाला लुटले आहे. आता यापुढे असे होणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल यांच्यावर केली आहे. राहुल यांचे नाव राहुल जिन्ना असे असायला हवे. ते त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. मुस्लीम तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे त्यांना मोहम्मद अली जिन्ना यांचा वारसा मिळाला आहे, अशी टीका भाजप खासदार आणि प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिम्हा राव यांनी राहुल यांच्यावर केली आहे.

‘भारत बचाव’ आंदोलनात राहुल गांधी यांनी देशाची अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कायद्या सुव्यवस्थेवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. कारण देशाची अर्थव्यवस्था ही देशाची आत्मा आहे, ही अर्थव्यवस्थाच मोदींनी मोडून टाकली.” म्हणून पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी हिंदुस्थान हा रेप कॅपिटल झाला आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावर भाजप नेते आक्रमक होऊन त्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यावर राहुल गांधी सभेत म्हणाले की, “माझे नाव राहुल सावरकर नाही, मी माफी नाही. सत्य बोलण्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही.” जीव देईन पण माफी मागणार नाही, तसेच मीच काय काँग्रेसचा कुठलाच व्यक्ती माफी मागणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या