
केरळमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत पत्रावर भारतीय जनता पक्षाचा शिक्का आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, आयोगाने तत्काळ कारवाई करत एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील निवडणूक विभागाकडून पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत पत्रावर निवडणूक आयोगाच्या शिक्क्याऐवजी भाजपच्या बूथ समितीचा शिक्का मारण्यात आला होता. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (TMC), सीपीएम (CPIM) आणि काँग्रेस या पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारी कागदपत्रांवर राजकीय पक्षाचा शिक्का कसा काय असू शकतो, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे.
टीएमसीने या घटनेचा तीव्र निषेध करत म्हटले की, ही घटना निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. निवडणूक आयोग आणि भाजपमध्ये काही साटेलोटे आहे का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
हा वाद वाढल्यानंतर केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, ही एक लिपिकीय चूक आहे. ज्या कर्मचाऱ्याने हा शिक्का मारला, तो कर्मचारी एका शाळेतील आहे जिथे भाजपचे निवडणूक साहित्यही हाताळले जात असावे किंवा ही मानवी चूक असावी. या घटनेची दखल घेत निवडणूक आयोगाने संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



























































