मिशन २०१९- हिंदु मतांसाठी भाजपचा मंदिरं आणि आश्रमांच्या डेटावर डोळा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. पण, आगामी निवडणुकीत विजयप्राप्तीसाठी सध्या भाजप एका खास तयारीला लागला आहे. या खास मिशनअंतर्गत भाजप मठ, मंदिरे आणि आश्रमांचे डेटा तयार करत असल्याचं वृत्त आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २०१९च्या विजयासाठी भाजप पारंपरिक हिंदू मतांची रणनीती आखत असून त्यासाठी पारंपरिक हिंदू मतदारांची यादी जमवण्याच्या कामाला लागला आहे. त्यासाठी भाजप प्रत्येक मतदान केंद्र पातळीवर स्थानिक मठ, मंदिरे आणि आश्रम यांचा डेटा मागवत आहे. त्याखेरीज अनुसूचित जाती, मागासवर्गीय जाती जमातींची यादीही जमा केली जात आहे.

भाजपने या कामासाठी संबंधित प्रदेश युनिटमध्ये या कामांची एक यादी तयार केली असून ती त्या त्या मतदान केंद्रामधील स्थानिक पक्ष कार्यालयाकडे देण्यात आली आहे. या यादीमध्ये त्या प्रभागात असणारी धार्मिक स्थळं, त्यांची लोकेशन्स, तिथल्या मुख्य पुजाऱ्याचा किंवा प्रतिनिधीचा क्रमांक देण्यात आला आहे. यात पक्षाच्या स्थानिक पातळीवरील ताकदीनुसार या याद्यांना कोड देण्यात आले आहेत.

या मिशनसाठी काम करणाऱ्या तब्बल २९ लाख कार्यकर्त्यांची एक टीम काम करणार आहे. हे कार्यकर्ते प्रत्येक धार्मिक स्थळाच्या प्रमुखाशी संपर्क करून त्यांच्या अनुयायांपर्यंत पोहोचण्याचं काम करेल. त्याखेरीज ४० लाख कार्यकर्ते स्थानिक पातळीवर जाऊन भाजपच्या राजकीय कामांविषयी लोकांना माहिती देणार आहेत.