पालिका निवडणूक जुन्या प्रभाग रचनेनुसार घेण्याचा भाजपचा घाट, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या राजकीय फायद्यासाठी 2017 मध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती. आता पुन्हा राजकीय फायद्यासाठी त्याच प्रभाग रचनेप्रमाणे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका घेण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. प्रभाग रचना, आरक्षण सोडत पूर्ण झाल्यावर दोन टप्प्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मागील तीन ते पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक आहे. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात 6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यांत प्रभाग रचना, आरक्षण सोडती पूर्ण करण्याच्या कामाला वेग आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे ईव्हीएम

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सुमारे एक लाख ईव्हीएमची आवश्यक्ता भासणार असल्याचे सांगण्यात येते. सध्याच्या घडीला राज्य निवडणूक आयोगाकडे सुमारे 65 हजार ईव्हीएम आहेत. त्यामुळे उर्वरित ईव्हीएमसाठी पेंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडील ईव्हीएममध्ये मागील निवडणुकांचा डेटा ईव्हीएमच्या मेमरीमध्ये आहे. या ईव्हीएममधील या मेमरीला व्हाईट मेमरी म्हणून ओळखली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएममधील व्हाईट मेमरी कार्ड काढून नवीन कार्ड टाकून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

– 687 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका
– एकूण महानगर पालिका 29
– प्रशासक असलेल्या महापालिका 29
– एकूण नगर परिषदा 248
– प्रशासक असलेल्या नगर परिषदा 248
– एकूण नगर पंचायती 147
– प्रशासक असलेल्या नगर पंचायती 42
– एकूण जिल्हा परिषदा 34
– प्रशासक असलेल्या जिल्हा परिषदा 32
– एकूण पंचायत समित्या 351
– प्रशासक असलेल्या पंचायत समित्या 336

चार प्रमुख पायऱ्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यापूर्वी सर्वप्रथम प्रभाग रचना करावी लागेल. त्यानंतर आरक्षण निश्चिती, मतदारयाद्या आणि मग प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम अशा चार प्रमुख पायऱया असल्याचे सांगण्यात येते. आचारसंहिता लागू झाल्यानंतर 35 दिवसांत निवडणूक कार्यक्रम पूर्ण करावा लागतो.

मुंबईत दुसऱ्या टप्प्यात मतदान

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी दिवाळी ऑक्टोबरच्या चौथ्या आठवडय़ात आहे. त्यामुळे दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका आणि दुसऱया टप्प्यात महानगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यताही एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.