बीकेसीतील पार्किंगची समस्या सुटता सुटेना , एमएमआरडीएच्या टेंडरना एकाचाही प्रतिसाद नाही

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचा (बीकेसी) वेगाने विकास होत आहे. नामांकित कंपन्या, बँका, परदेशी कंपन्यांची आलिशान कार्यालये तिथे आहेत. रोज सुमारे 50 हजार वाहनांची वर्दळ असते, पण ती वाहने उभी करण्यासाठी पार्किंगची समस्या अजूनही सुटलेली नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पार्किंग लॉटसाठी निविदा काढल्या, अनेकदा मुदतवाढ दिली, परंतु अद्याप एकानेही त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

बीकेसीतील पायाभूत सुविधांच्या विकासाठी जबाबदारी एमएमआरडीएवर आहे. बीकेसीत बहुमजली पार्किंग लॉट बनवण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढल्या. पाच ठिकाणी हे पार्किंग लॉट बनवायचे आहेत, परंतु त्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत कुणीही इच्छुक पुढे आलेला नाही.

बीकेसी म्हणजे मुंबईतील बिझनेस हब बनला आहे. तिथे आयसीआयसीआ, इफ्रास्ट्रक्चर लिजिंग ऍण्ड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, नाबार्ड, एनएसई, बँक ऑफ इंडिया, इन्कम टॅक्सची कार्यालये आहेत. बरोबरच शिक्षण संस्थाही आहेत. पार्किंग लॉटचा प्रश्न सुटला नाही तर बीकेसीच्या विकासाला खिळ बसण्याची शक्यता आहे.

पार्किंग लॉट उभारण्यासाठी मोठा खर्च करावा लागणार आहे. पार्किंग लॉटचे काम पाहण्याची आणि देखभालीची जबाबदारी स्वीकारण्यास अनेक जण तयार आहेत, परंतु बांधकाम करण्यास त्यांची तयारी नाही अशी माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एमएमआरडीएच्या निविदांमध्ये मात्र बांधकामासहित काम आणि देखभाल यांचा उल्लेख असल्यानेच कुणी निविदा भरलेल्या नसाव्यात असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे निविदा भरण्यास आणखी मुदतवाढ देण्याचाही एमएमआरडीएचा विचार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या