गुप्तधनासाठी जादू टोना करताना एकाला पकडले, तीन पळाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रतिकात्मक छायाचित्र

सामना प्रतिनिधी । हिंगोली

वसमत तालुक्यातील गिरगाव जवळील टोकाई देवीच्या मंदिरापासून पन्नास फूट अंतरावर खड्डा खोदून गुप्तधन मिळण्याच्या लालसेने जादूटोणा करत असताना पोलिसांनी धाड टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. तर तीन जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसमत तालुक्यातील गिरगाव येथील टोकाई देवी मंदिरापासून काही अंतरावर गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळाली होती. 24 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी देवीच्या मंदिरातील शेंदूर लावलेली शिळा मूळ जागेपासून बाजूला करून जादूटोणा करत गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी खड्डा खोदण्यात आल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच या जागेवरून हळद-कुंकू तांदळाच्या पुढे लिंबू असे साहित्यही पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी या ठिकाणाहून गंगाराम केरबा वाठोरे रा. मराठा ता. हदगाव जिल्हा नांदेड याला ताब्यात घेतले. तर कळमनुरी तालुक्यातील रामवाडी येथील आणि औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथील तसेच एक अनोळखी व्यक्ती असे तिघेजण पोलीस आल्याची चाहूल लागल्यावर पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. रामवाडी व शिरड शहापूर येथील दोन्ही व्यक्तींची पूर्ण नावे माहिती नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस जमादार आनंदा वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाराम केरबा वाठोरे याच्यासह चार जणांविरुद्ध कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसमत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्रसिंग धुने हे करीत आहेत. पोलिसांनी पकडलेला गंगाराम वाठोरे हा सध्या कळमनुरी तालुक्यातील येथे वास्तव्यास असल्याचेही सांगण्यात आले.