Operation Sindoor- लाहोर स्फोटांनी हादरलं!!!

हिंदुस्थानने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर, दुसऱ्या दिवशी लाहोरमध्ये स्फोटांची मालिका सुरु झालेली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी रॉयटर्स वृत्तसंस्था आणि स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे की, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याने सायरन वाजले आणि लोक घराबाहेर पळून जाऊ लागले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ‘सिंदूर’ नावाच्या ऑपरेशनमध्ये हिंदुस्थानने पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, वॉल्टन विमानतळाजवळील लाहोरच्या गोपाल नगर आणि नसीराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. लोक घाबरून घराबाहेर पळताना आणि धुराचे लोट पाहताना दिसत आहेत. हा परिसर लाहोरच्या पॉश सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट आणि लाहोर आर्मी कॅन्टोन्मेंटला लागून आहे. स्थानिक वृत्तानुसार सियालकोट आणि लाहोर विमानतळांवरही उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

लष्कर आणि हवाई दलाच्या (IAF) संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तोयबा (LeT) या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांना बेचिराख केले होते. हवाई दलाने राफेल जेट विमानांचा वापर करून हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्र हल्ले केले, तर लष्कराने एकाच वेळी जमिनीवरून जमिनीवर क्षेपणास्त्रे डागली होती. या अचूक हल्ल्यांमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 80-90 दहशतवादी ठार झाले, असे सूत्रांनी सांगितले. सरकारने असा दावा केला की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ला झाला नाही आणि नागरिकांचे जीवितहानी टाळण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांची काळजीपूर्वक निवड करण्यात आली होती.