जालना – उकळते लोखंड अंगावर पडल्याने 3 कामगारांचा कोळसा, 7 गंभीर जखमी

1259
प्रातिनिधिक फोटो

जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या ‘ओम साईराम स्टिल अ‍ॅण्ड अलॉय’ या कंपनीत गुरुवारी भीषण अपघात झाला. या अपघातात 3 कामगार जाग्यावरच ठार झाले. 7 कामगार गंभीर भाजले आहेत, तर दोन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.

अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये राजेंद्र भारुका आणि दिनेश भारुका यांच्या मालकीची ‘ओम साईराम स्टिल अ‍ॅण्ड अलॉय’ ही लोखंडी सळई निर्माण करणारी कंपनी आहे. आज 5 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वितळलेले लोखंड वाहून नेणारी स्काय बकेट तुटून खाली पडल्याने बकेटमध्ये असलेला लोखंडाचा तप्त रस कामगारांच्या अंगावर कोसळला. हा लोखंडाचा तप्त रस कामगारांच्या अंगावर पडल्याने यात 3 कामगारांचा भाजून जागेवरच कोळसा झाला. तर अन्य 7 कामगार गंभीररित्या भाजले असून त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. तर दोन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत.

company

जिल्हा पोलीस अधिक्षक एस.चैतन्य यांनी सांगितले की, या अपघातात 3 कामगारांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक एम.के. राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात तीन जळालेले मृतदेह आले असून अद्यापपर्यंत पोलिसांकडून याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे मृत झालेल्यांची नावे कळू शकली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या