
>> महेश उपदेव
अद्भुत धैर्य आणि जिद्दीचे प्रदर्शन करत नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अलीकडेच पाल्क सामुद्रधुनी पार करून इतिहास रचला. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली ईश्वरी पांडे ही कामगिरी करणारी जगातील पहिली जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नार ते हिंदुस्थानातील धनुष्कोडी इथपर्यंत जलतरण करत हा विक्रम केला आहे. ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नारजवळील उर्मलाई पॉईंट येथून 6 एप्रिल रोजी पहाटे 4 च्या सुमाराला जलतरणास सुरुवात केली. तिने सलग 11 तास 15 मिनिटे जलतरण केले. हिंदुस्थानातील धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी दाखल झाली. तिने समुद्रातील प्रबळ लाटा, बदलते भरती-ओहोटीचे स्वरूप आणि जेलिफिशचा सामना करत अतुलनीय कामगिरी करून दाखवली आहे. जन्मापासूनच दोन्ही डोळ्यांनी दिसत नसलेल्या ईश्वरीने खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धांमध्ये सातत्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. ईश्वरीची ही कामगिरी जिद्द आणि चिकाटीचे आदर्श उदाहरण आहे. अद्भुत कामगिरी करीत ईश्वरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला आहे. अथांग सागर, पावसामुळे खराब वातावरण, वारे आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटा, डॉल्फिन, शार्क, जेलिफिशसारख्या महाकाय आणि धोकादायक समुद्री जिवांचा धैर्याने सामना करत नागपूरची जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अतिशय कठीण, आव्हानात्मक असणारी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) ही 38 किमी अंतराची पाल्कची सामुद्रधुनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. ही ऐतिहासिक मोहीम फत्ते करणारी जगातील प्रथम दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे. अर्थात या मोहिमेत निसर्गानेही तिची खूप परीक्षा घेतली. ईश्वरीचे प्रशिक्षक संजय बाटवे यांनी त्यांच्या शिष्येने केलेल्या विश्वविक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, ईश्वरीचा पराक्रम खरोखरच काwतुकास्पद आहे. या मोहिमेदरम्यान तिला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पाऊस, वारा आणि भयंकर लाटांचा तिला प्रचंड त्रास झाला. त्यामुळे इव्हेंट सुरू व्हायला तब्बल चार तास उशीर झाला. अखेर श्रीलंका सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर पहाटे 4 वाजता ईश्वरीने तलाईमन्नार जेट्टी येथील समुद्रात उडी घेतली. 11 तास 15 मिनिटे मॅरेथॉन स्विमिंग करत दुपारी 3.15 वाजता तिने हिंदुस्थानचे टोक असलेले धनुष्कोडी गाठले.
या अभियानात ईश्वरीसोबत नागपूरचे अनुभवी जलतरणपटू इशांत पांडे, रवींद्र तरारे, भावी राजगिरे, संदीप वैद्य, शंकर आष्टणकर, विलास फाले आणि डॉ. नीरव पंडया यांनी ‘पेस स्विमर’ म्हणून भूमिका पार पाडली. तसेच वैद्यकीय टीममध्ये डॉ. अभय राजगिरे, निरीक्षक म्हणून राष्ट्रीय प्रशिक्षक विजयकुमार, तामीळनाडू जिल्हा जलतरण संघटनेचे जयकुमार आणि आंतरराष्ट्रीय सागरी जलतरणपटू सुखदेव धुर्वे उपस्थित होते. आशीर्वादनगर, हुडकेश्वर येथे राहणाऱया ईश्वरीचे वडील कमलेश पांडे जिल्हा परिषदेत संगणक ऑपरेटर असून आई अरुणा पांडे गृहिणी आहेत.


























































