पर्यावरण बदलावर लोदगा येथे तीन दिवसांची कार्यशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

पर्यावरणात झपाट्याने बदल होत आहेत. जागतिक तापमानवाढ हा चितेंचा विषय बनला आहे. या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी हैदराबादच्या राष्ट्रीय ग्रामीण विकास पंचायतराज संस्थातर्फे औसा तालुक्यातील लोदगा येथे तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 25 ते 27 जानेवारीदरम्यान ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत पाशा पटेल म्हणाले की , ही संस्था वातावरण बदलावर काम करीत आहे. हवामानातील बदलाने जागतिक स्तरावर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. मानवजातीचा विनाश होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या कार्यशाळेत विचारमंथन करून चर्चा केली जाणार आहे. यासाठी देशातील या संदर्भात काम करणाऱ्या 200 सेवाभावी संस्थाच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले आहे. त्यापैकी 150 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण पंचायतराज संस्थेचे सचिव डब्लू. आर. रेडडी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. इतर अनेक मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार असून लातूर परिसरातील प्रतिनिधींनी यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन पटेल यांनी केले आहे.