वरळीत जपले जातेय ‘नाते आपुले रक्ताचे’;शिवसेनाप्रमुखांना अनोखी मानवंदना

वरळीतील शिवसेनेची मध्यवर्ती शाखा गेल्या शंभर महिन्यांपासून रक्ताचे नाते जपत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणापासून एक तारीख, एक दिवस आणि रक्तदान शिबीर ही एक परंपराच झाली आहे. सण, उत्सव असो अथवा संकट असो प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला वरळीच्या शिवसेना शाखेत रक्तदान शिबीर होतेच.  आतापर्यंत कोणताही खंड पडू न देता यशस्वीपणे 99 रक्तदान शिबिरे पार पाडली असून उद्या शनिवारी 100 व्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुखांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे.

17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुखांचे महानिर्वाण झाले. त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या समाजकार्याच्या शिकवणीप्रमाणे नगरसेवक अरविंद भोसले यांनी दर महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा संकल्प केला. आतापर्यंत त्यांनी 99 रक्तदान शिबिरे आयोजित केली असून 100 वे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरात रक्तदान करण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 9821581860, 9324928960 या क्रमांकावर आगाऊ नोंदणी केली जात असल्याचे अरविंद भोसले यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांना आदरांजली म्हणून आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरांमध्ये संकलित झालेले रक्त मुंबईसह महाराष्ट्रातील विविध रक्तपेढय़ा आणि रुग्णालयांच्या माध्यमातून गरजूंना मोफत पुरवले जाते.

महायज्ञ सुरूच आहे

गेली शंभर महिने रक्तदानाचा हा महायज्ञ सुरूच आहे, असे सांगून अरविंद भोसले यांनी या शिबिरांसाठी सहकार्य करणाऱया मातृभूमी सेवा ट्रस्ट, जागृती ट्रस्ट, आचार्य अत्रे स्मारक समिती, प्रबोधन रक्तपेढी यांच्यासह अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या