
महापालिका रुग्णालयांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांसाठी देण्यात येणाऱ्या वाहनांच्या परवानगीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या सहीची अट अनिवार्य करण्यात आली आहे. यामुळे वेळ वाया जात असल्याने रक्तदान शिबिरे अडचणीत आली आहेत. ही स्थिती अशीच राहिल्यास रक्त तुटवडा निर्माण होऊन पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होण्याची भीती आहे.
मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, शीव आदी रुग्णालयांच्या रक्तपेढय़ांच्या माध्यमातून मुंबईच्या विविध भागांसह मुंबईबाहेर रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त संकलन केले जाते. हे रक्त संकलन करण्यासाठी जाणाऱ्या गाडय़ांना संबंधित रुग्णालयाचे अधिष्ठाता सहीने परवानगी देत होते. मात्र आता या गाडय़ांना अतिरिक्त आयुक्तांच्या सहीसह परवानगी अनिवार्य केली आहे. परिणामी रक्तदान करण्याचा संबंधित प्रस्ताव रखडला जातो. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास आगामी काळात रक्त तुटवडय़ामुळे रुग्णसेवेवर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या संकलन शिबिरासाठी पूर्वीप्रमाणे अधिष्ठाता यांच्या सहीने वाहने नेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र दिले आहे.
रक्तदान शिबिरे रद्द करण्याची नामुष्की
केवळ वाहनांना परवानगी मिळत नसल्याने आयोजित करण्यात आलेली रक्तदान शिबिरे रद्द करण्याची नामुष्की रुग्णालय प्रशासनावर येते. गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारे भाईंदर, भिवंडी, पनवेल आदी ठिकाणी आयोजित करण्यात आलेली रक्तदान शिबिरे रद्द करावी लागल्याचे पडवळ यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
































































